लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात १९९४ नंतरचा सिंचन, कृषी, आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय, तंत्रशिक्षण व अनुशेषाचा डोंगर वाढतो आहे. त्या अनुशेषाबाबत आढावा बैठक सोमवारी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी घेतली. बैठकीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मतेही त्यांनी जाणून घेतली.मराठवाड्याच्या विकासासंदर्भात यापूर्वीच १ हजार १६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. प्रस्तावातील कोरडवाहू शेती व पूरक उद्योग क्लस्टर, वैद्यकीय पॅरामेडिकल तंत्रज्ञान महाविद्यालय, सूक्ष्म सिंचन, किनवट येथील नर्सिंग शाळायावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.मराठवाड्याचा विकास व अनुशेषासंदर्भात बैठकीचे आज आयोजन केले होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मंडळाचे अपर आयुक्त व सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, माजी सनदी अधिकारी कृष्णा भोगे, भास्कर मुंडे, तज्ज्ञ शंकरराव नागरे, कृष्णा लव्हेकर, डॉ. अशोक बेलखोडे, मुकुंद कुलकर्णी, प्रदीप देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. वराडे, मराठवाड्यातील जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.मराठवाड्यातील युवकांना रोजगार मिळावा, या दृष्टिकोनातून आगामी काळात १० लाख रोजगार उपलब्ध व्हावेत, याबाबत प्रशासनामार्फ त प्रयत्न करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाण्याची साठवण झाली आहे. या साठवण झालेल्या पाण्यामध्ये मत्स्य शेती करण्याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शेतीला तुती लागवड, प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याचाही विभागाचा मानस असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.बैठकीत तज्ज्ञांनी मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर संगणकीय सादरीकरणातून माहिती दिली. यामध्ये सिंचन, कृषी, आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय, तंत्रशिक्षण व १९९४ नंतरच्या अनुशेषाचा समावेश होता. डॉ. वराडे, भोगे, मुंडे यांनी विभागाच्या विकासासाठी सूचना केल्या.
मराठवाड्यात अनुशेषाच्या वाढत्या डोंगरावर चिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:39 IST