गंगापूर: येथील गट साधन केंद्राला शुक्रवारी (दि.२१) सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये गटसाधन केंद्रातील नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या नवीन पुस्तकांसहित इतर महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले. आग लागल्यानंतर तब्बल दोन तासांनी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
पंचायत समिती आवारात असलेल्या गट साधन केंद्राच्या मागील बाजूस महावितरणच्या ३३ केव्हीची उच्च दाब विद्युत वाहिनी गेली आहे. शुक्रवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास या तारांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे येथील कचऱ्याने पेट घेतला. त्यानंतर ही आग गटसाधन केंद्रात पसरली. गट साधन केंद्राच्या मागे राहणारे पवन चव्हाण यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याविषयी माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.
दरम्यान, गंगापूर पालिकेच्या अग्निशामक गाडीमध्ये पाणी नसल्याने व चाकांची हवा गेल्याने या गाडीला घटनास्थळी यायला वेळ लागला. मात्र, तोपर्यंत वाळूज औद्योगिक वसाहतीची अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली. आग लागल्यानंतर २ तासांनी १० वाजेच्या सुमारास या दोन्ही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. आगीत पुढील शैक्षणिक वर्षात पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले पुस्तके व इतर महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
शिक्षकांच्या सेवा पुस्तिका सुरक्षितआग लागलेल्या गट साधन केंद्रातील दुसऱ्या खोलीमध्ये सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवा पुस्तिका होत्या. मात्र, आग लागल्याचे लवकर लक्षात आल्याने सदरील सेवापुस्तिका सुरक्षित राहिल्या