उमरगा : सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी होत असलेल्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून शहरातील एका विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली़ ही घटना रविवारी घडली असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील धनराज कांबळे यांची मुलगी सुनंदा हिचा जून २०१४ मध्ये वाघोली (ता़औसा) येथील विजयकुमार मारूती टेकाळे याच्याशी विवाह झाला होता़ विवाहाच्या एका वर्षानंतर सासू वंदना टेकाळे, सासरा मारूती टेकाळे, जावाई विजयकुमार टेकाळे हे सतत नोकरी लावण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेवून ये, लग्नापूर्वी ठरलेले ५० हजार रूपये घेवून ये म्हणून सतत शारीरिक, मानसिक छळ करीत होते़ काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी व जावाई उमरगा येथे राहण्यासाठी आले होते़ मात्र, दोघांमध्ये सतत भांडणे होत होती़ रविवारीही दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर धनराज कांबळे व त्यांच्या पत्नी हे दोघे भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर जावायाने अंगावर येवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी मध्यस्ती करून त्यांच्या पत्नीने भांडण सोडविले़ तेथून धनराज कांबळे हे बाहेर आले असता काही वेळातच त्यांना त्यांची मुलगी सुनंदा हिने पेटवून घेतल्याचे कळाले़ ते तत्काळ उपजिल्हा रूग्णालयात गेल्यानंतर सुनंदा ही मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच सुनंदा हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून मयतेचा पती विजयकुमार मारूती टेकाळे, सासू वंदना मारूती टेकाळे, सासरा मारूती टेकाळे, नणंद वैशाली दिनकर मोरे, नंदवा दिनकर देविदास मोरे यांच्याविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि कासले हे करीत आहेत़
उमरग्यात विवाहितेची आत्महत्या
By admin | Updated: April 25, 2016 23:29 IST