छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी महापालिकेच्या नगररचना विभागाने महावीर चौक ते लेबर कॉलनीपर्यंत मार्किंग केली. ‘व्हीआयपी’ अशी या रस्त्याची ओळख असून, शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याची रुंदी ३५ मीटर म्हणजेच ११५ फूट आहे. रुंदीकरणामुळे अनेक मालमत्ता बाधित होत आहेत.
शहरात महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेची मोठी दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत जवळपास पाच हजार मालमत्ता पाडण्यात आल्या. अनधिकृत बांधकाम केलेल्या मालमत्ताधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मागील आठ दिवसांपासून पाडापाडी थांबविण्यात आली असली तरी संभाव्य रस्त्यांवर भोंगा फिरवणे, मार्किंग इ. कामे सुरू आहेत. गुरुवारी मनपाचा भोंगा चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यासाठी फिरविण्यात आला. या रस्त्याची संयुक्त मोजणी झालेली नाही. रस्त्याची अलाइनमेंट बदलण्यात आली असल्याने तो वादही खंडपीठात आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे १०० फूट रस्ता नवीन आराखड्यात ६० फूट केला आहे. गुरुवारी जटवाडा रोडवरही भाेंगा फिरवण्यात आला. नारेगाव येथील मुख्य ३० मीटर रस्त्यासाठी मार्किंग करण्यात आली.
शुक्रवारी दुपारपासून महावीर चौकापासून नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३५ मीटरच्या अनुषंगाने मार्किंगला सुरुवात केली. या रस्त्यावर आमखास मैदान, किलेअर्क भागात अगोदरच मनपाकडून मार्किंग देण्यात आली होती. मार्किंगमुळे अनेक खाजगी मालमत्ता, शासकीय कार्यालये बाधित होत असल्याचे दिसून आले.
महावीर चौक ते लेबर कॉलनीपर्यंत शुक्रवारी मनपाकडून मार्किंग करण्यात आली. ३५ मीटर रुंद रस्त्यासाठी मार्किंग केली. यामध्ये विविध मालमत्ता बाधित होत आहेत.रहिवासी : ०६वाणिज्य वापर : ६४मिश्र वापर : २१एकूण :– ९१