खुशालचंद बाहेती औरंगाबाद : गेल्या वर्षभरात मराठवाड्यात २७४ जणांना लाचेच्या सापळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याशिवाय १५ जणांविरुद्ध अपसंपदा व अन्य भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेल्या व राज्यातील सर्वाधिक शासकीय-निमशासकीय कार्यालये व कर्मचारी संख्या असलेल्या मुंबई शहरात फक्त ४१ लाचेचे सापळे यशस्वी झाले.लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात इतर कोणत्याही विभागापेक्षा किमान ५ पट अधिकारी-कर्मचारी मुंबईत आहेत व खुद्द या विभागाचे प्रमुखही तेथेच आहेत. तरी मुंबईतील अधिकाऱ्यांनी यशस्वी सापळे केले नाही याचा अर्थ मुंबईत लाचखोरी अत्यल्प असावी किंवा ला.लु.प्र. विभाग अकार्यक्षम.ला.लु.प्र. विभागाची मराठवाड्यानंतर सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रातील (१८७) व त्यानंतर नाशिक (१२५), नागपूर (१११) व अमरावती (१०६) यांचा क्रमांक लागतो. अमरावती परिक्षेत्रातील कारवाईत गतवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक ६ % वाढ झाली आहे. यापूर्वी अमरावतीचे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी थेट नांदेडमध्ये जाऊन जी. विजयकृष्ण यादव या आयपीएस अधिकाºयावर ३ लाखांचा सापळा यशस्वी केला. राज्याच्या अन्य भागातील सापळ्यांच्या तुलनेत मुंबई शहराचे प्रमाणपत्र चिंताजनक आहे.ला.लु. प्र. विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांनी काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत. अरविंद चावरिया यांनी जुलैमध्ये पदभार घेतल्यानंतर सर्वात प्रथम विभागात अनेक वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त २२ पोलिसांना मूळ घटकात परत केले. नवीन कर्मचारी घेताना लेखी परीक्षा सुरू केली. त्यामुळे शिफारशीवरून खात्यात प्रवेश बंद झाला. सापळ्यासाठी तक्रारदाराने फोन केल्यानंतर त्यांना कार्यालयात बोलवण्याऐवजी ला.लु.प्र. विभागाचे अधिकारीच त्यांच्याकडे जातात व तेथून परस्पर सापळा लावला जातो.यामुळे तक्रारीची गोपनीयता भंग होत नाही व सापळा यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते, असे चावरिया यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराला ज्या कामासाठी लाच मागितली जात आहे ते काम कायदेशीर असेल तर ते करून देण्याची जबाबादारी ला.लु.प्र.वि. स्वीकारत आहे.औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व ला.लु.प्र. कार्यालयांत सीसीटीव्ही लावण्यात आले असून, कोणी तक्रारदार आला आहे काय व त्याला अधिकारी कसा प्रतिसाद देत आहेत, हे चावरिया सतत मोबाईलवर पाहत असतात.सध्या विभागासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा व्हॉईस रेकॉर्डिंगच्या तपासणीचा आहे. लाचेच्या मागणीचा आवाज तपासण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत पाठवण्यात येतो. औरंगाबाद परिक्षेत्रातील ११७ सॅम्पल तपासणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे खटल्यांना विलंब होतो व शिक्षेचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू असल्याचे अरविंद चावरिया यांनी सांगितले.>कोणताही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी लाच मागत असेल, तर थेट मोबाइलवर संपर्क साधा. पूर्ण गोपनीयता ठेवली जाईल व कायदेशीर काम पूर्णही करून दिले जाईल.- अरविंद चावरिया,पोलीस अधीक्षक, एसीबी, औरंगाबाद परिक्षेत्र.
लाचलुचपतीचे सर्वाधिक सापळे मराठवाड्यात; औरंगाबाद अधीक्षकांचे नवनवीन उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:39 IST