औरंगाबाद : देवळाई चौकातील वाईन शॉपच्या व्यवस्थापकानेच मालकाचा विश्वासघात करून ३३ लाख १७ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. याप्रकरणी व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.
अक्षय अरविंद सबनीस (रा. शिवाजीनगर) असे अपहार केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक नवले यांनी सांगितले की, सिडको, एन-३ येथे अमरदीपसिंग त्रिलोकसिंग सेठी यांची कंपनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील शासन मान्य दारू दुकान, वाईन शॉप, हॉटेल आणि बीअर शॉपीला होलसेल दराने मद्य पुरवठा करते. भुसावळ येथील अनिल प्रल्हाद नागराणी आणि किशोर मार्तंड काळकर यांच्या मालकीचे देवळाई रस्त्यावर थ्री स्टार वाईन शॉप आहे.
ते सेठी यांचे मित्र आहे. त्यांनी सेठी यांना त्यांच्या वाईन शॉपचे व्यवस्थापन पाहण्याची विनंती केली होती. सेठी यांनी अक्षय सबनीस याला ६ एप्रिल २०१८ रोजी वाईन शॉपीचा व्यवस्थापक म्हणून नेमले होते. ६ एप्रिल ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेठी यांनी एक कोटी ३५ लाख २९ हजार ३८४ रुपयांचा मद्यसाठा दुकानात विक्रीसाठी ठेवला होता. ३१ डिसेंबरपर्यंत सबनीसने १ कोटी ३३ लाख १७ हजार ३१६ रुपयांचे मद्य विक्री केले. मद्य विक्रीतून प्राप्त रकमेपैकी १ कोटी २० हजार ३६६ रुपये सेठी यांच्या कंपनीच्या बँक खात्यावर जमा केले.
ही बाब सेठी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सबनीसकडे विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. ३३ लाख १७ हजार ३१६ रुपयांचा सबनीसने अपहार केल्याचे सेठी यांचे लेखापाल प्रशांत वाघ यांनी केलेल्या हिशेब तपासणीनंतर स्पष्ट झाले. सेठी यांच्या वतीने प्रशांत वाघ यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर हा अर्ज चौकशीसाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे आला. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची चौकशी केल्यानंतर यात तथ्य असल्याचे समोर आले.