परभणी : शहरातील अनाधिकृत मोबाईल टॉवरविरुद्ध महापालिकेने कारवाई करीत ३७ टॉवरला सील ठोकले आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत टॉवरधारकांकडून ७५ लाख ६० हजार रुपयांची वसुली झाल्याची माहिती देण्यात आली.शहराच्या विविध भागात खाजगी मोबाईल कंपन्यांनी आपले टॉवर उभारले आहेत. अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवर कंपन्या वसुली अदा करीत नव्हत्या. तसेच रितसर परवानगी न घेताच टॉवर्स उभे केले जात होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त राहुल रेखावार यांनी १५ मार्च रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार प्रभाग समिती अ चे पथकप्रमुख बी.एन. तिडके, ब चे पथकप्रमुख अ. माजीद काजी आणि क चे पथकप्रमुख पंडित अडकिणे यांनी १६ व १७ मार्च असे दोन दिवस शहरात फिरुन अवैध मोबाईल टॉवरविरुद्ध कारवाई केली. यात ३७ टॉवर्सला सील ठोकण्यात आले आहे. परभणी शहरात १२० मोबाईल टॉवर असून काही टॉवरधारकांनी स्वत:हून वसुली अदा केली आहे. आतापर्यंत ७५ लाख ६० हजार रुपयांचा भरणा झाला आहे, अशी माहिती कर अधीक्षक श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली. शहरातील तीनही प्रभाग समिती अंतर्गत स्थापन केलेल्या पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे मनपाने कळविले. (प्रतिनिधी)
मनपाने ठोकले ३७ टॉवरला सील
By admin | Updated: March 18, 2016 00:06 IST