छत्रपती संभाजीनगर : विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यात पोलिस ठाण्यातील 'साहेबांना' सांगून मदत करतो, असे म्हणत खासगी वाहन चालक आकाश सुनील शिंदे (३२, रा. जय भीमनगर) याने 'पाेलिसांना मॅनेज' करण्याची भाषा करत २० हजारांच्या लाचेची मागणी केली. तीन महिन्यांपासून त्याच्या मागावर असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला शनिवारी अटक करत सिटी चौक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
४० वर्षीय इसमावर नोव्हेंबर महिन्यात सिटी चौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याच्या आवारात वावर असलेल्या आकाशने त्यांना हेरले. दाखल गुन्ह्यात पाेलिस ठाण्यातील 'साहेबांना' बोलून मदत करतो. त्यासाठी वीस हजार रुपये लागतील, अशी मागणी केली. २५ नोव्हेंबर रोजी इसमाने त्याची थेट एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी खातरजमा करून सापळा रचला. मात्र आकाशला याची कुणकुण लागल्याने लाच न स्विकारताच तो पसार झाला.
नोव्हेंबर महिन्यात आकाशने लाच घेण्यास नकार देत पसार झाला. त्यानंतर एसीबीने सापळ्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सतर्क झाला होता. त्यामुळे लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी शनिवारी त्याला अटक केली.