औरंगाबाद : मंगळवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने जिल्ह्यात ११ कॉपीबहाद्दरांना पकडले. दरम्यान, एका ठिकाणी विद्यार्थ्याकडे चक्क प्रेमपत्र आढळून आल्याचे पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी डोक्यालाच हात लावला.
सध्या १० वी, १२ वीच्या परीक्षेचा फिव्हर सुरू आहे. शिक्षण विभागाची संपूर्ण यंत्रणा परीक्षेत मग्न आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासाबरोबर परीक्षेचे दडपण आहे, तर कॉपी बहाद्दर परीक्षार्थी भरारी पथकाच्या रडारवर आहेत.
कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील परीक्षा केंद्र हे बोर्डाने उपद्रवी केंद्र म्हणून घोषित केले आहे. मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक तेलवाडी तांड्यावरील परीक्षा केंद्रावर पोहोचले.
भरारी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली तेव्हा या परीक्षा केंद्रावर एक अफलातून कॉपीबहाद्दर पकडण्यात आला. त्या कॉपीबहाद्दराकडे चक्क प्रेमपत्रच सापडले. परीक्षेच्या दिवसांत रात्ररात्र जागून विद्यार्थी अभ्यास करतात, काही जण कॉपी लिहिण्याची मेहनतही घेत असतात; पण या विद्यार्थ्याने रात्रभर जागून चक्क प्रेमाचा स्वीकार कर, अशी हाक देणारे प्रेमपत्र लिहून ते परीक्षेला येताना सोबत आणल्याचे आढळून आले. यंदापासून दहावीच्या प्रश्नपत्रिका या कृतिपत्रिकेच्या स्वरूपात आहेत. तेलवाडी तांड्यावरील परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडे कृतिपत्रिकेसोबत प्रेमपत्र पाहून शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण हे तर आवाक् झाले.