नांदेड :प्रवाशांच्या तपासणीसाठी नांदेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत़ परंतु मेटल डिटेक्टरचा परिणामकारीता मात्र शून्य आहे़ हे मेटर डिटेक्टर सुरु आहेत की बंद हाही संशोधनाचा विषय आहे़ सध्या गर्दीचा हंगाम असताना रेल्वेस्थानकावरील सुरक्षा मात्र रामभरोसेच असल्याचे आढळून आले़ हैदराबाद-मुंबई लोहमार्गावरील नांदेड हे अतिशय महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे़ दिवसाकाठी जवळपास ५५ रेल्वेगाड्या नांदेड स्थानकात येतात़ मनमाड, मुंबई, अमृतसर, हैदराबाद, तिरुपती,अजमेर, नागपुर आदी ठिकाणी जाणार्या रेल्वेगाड्यांची मोठी वर्दळ असते़ तीन वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण, सुशोभिकरण करण्यात आले़ प्रवाशांवर निगरानीसाठी जवळपास २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत़ यापैकी १९ फिक्स तर उर्वरीत पाच मुव्हींग कॅमेरे आहेत़ परंतु या सीसी टिव्ही कॅमेर्याच्या आधारे किती गुन्ह्यांना आळा घालण्यात किंवा छडा लावण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाले हे कुणीही निश्चितपणे सांगू शकत नाही़ या कॅमेर्याचा दर्जाही सुमार असल्यामुळे त्याने टिपलेल्या हालचालीवरुन एखाद्याची ओळख पटविणे अग्निदिव्यच आहे़ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी होते़ त्यात रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी मात्र फलाटावर फिरकतही नाहीत़ बेवारस स्थितीत पडलेल्या सामानाकडेही साफ दुर्लक्ष करण्यात येते़ रेल्वे रुळ ओलांडू नये असा नियम असताना, या ठिकाणी सर्रासपणे फलाटावर जाण्यासाठी प्रवाशी रेल्वे रुळाचाच वापर करतात़ तसेच गर्दीच्या वेळी गाडीत जागा मिळावी यासाठी धोकादायक पद्धतीने ट्रकवर उभे राहतात़ या सर्व बाबींकडे रेल्वे प्रशासन आणि संबधित सुरक्षा रक्षक यांनाही काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होते़ सध्या लगीनसराई असल्यामुळे रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे़ प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनानेही तेवढेच जागरुक राहणे गरजेचे असून डब्बे वाढविण्याची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
प्रवाशांच्या सुरक्षेला खो
By admin | Updated: May 19, 2014 00:17 IST