छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते तन आणि मनाने तुमचे काम करतील, तुम्ही फक्त रसद पुरवा, अशी साद मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महायुतीला घातली.
शहरातील आयएमए हॉल येथे शनिवारी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, मनसेचे संपर्क नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, दिलीप बनकर पाटील, दिलीप चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी गळ्यात मनसेचे गमछे घातले होते.
नांदगावकर म्हणाले की, या निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मिळावा, पक्षप्रमुखांचे छायाचित्र प्रचार रॅलीत असावे. मनसे १८ वर्षांपासून सत्तेत नाही. पक्षाचे कार्यकर्ते तन आणि मनाने तुमचे काम करतील, तुम्ही त्यांना धन द्या, अशी मागणीच त्यांनी उपस्थित महायुतीच्या नेत्यांकडे केली. यावर मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी दिली, तर आ. शिरसाट यांनी मनसे आणि शिंदेसेनेचे एकच कुळ असल्याचे सांगितले.
मनसेला हव्या होत्या चार जागामनसेने महायुतीकडे चार जागांची मागणी केली होती. नंतर तीन जागांवर आम्ही आलो, परंतु ते एकच जागा देण्यास तयार झाले. शिवाय कमळ चिन्हावर निवडणूक लढा, असा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले.