- ससो खंडाळकरऔरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीला सुमारे दीड वर्षाचा कालावधी असला तरी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मराठवाड्यातील आठही मतदारसंघांवर भाजपने दावा सांगितल्याने बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे समजते.
‘शत प्रतिशत भाजप’ मिशन अंतर्गत मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा डोळा दिसतोय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी औरंगाबाद येथून जणू लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. सध्या जालन्यातून रावसाहेब दानवे, बीडमधून प्रीतम मुंडे, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे असे चार खासदार भाजपचे आहेत. औरंगाबादमधून इम्तियाज जलिल हे एमआयएमचे, परभणीमधून संजय जाधव व उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत. तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात गेलेले आहेत.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी, मराठवाड्याच्या सर्व जागा भाजप लढेल, असे म्हटले आहे. असे झाले तर मग शिंदे गटाचे अस्तित्व ते काय उरेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी औरंगाबाद जिल्ह्यात झाली. पैठणचे संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट, मध्यचे प्रदीप जैस्वाल, सिल्लोडचे अब्दुल सत्तार, वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे हे बंडखोरीत अग्रभागी होते. कन्नडचे उदयसिंह राजपूत हे शिंदे गटातून वेळीच परत फिरले. जिल्ह्यात फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, गंगापूर - खुलताबादमधून प्रशांत बंब एवढेच भाजपचे आमदार आहेत. आमदारांच्या संख्येचा विचार करता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सुटायला हवा, असा शिंदे गटाचा आग्रह आहे.
शिंदे गटाचे एक आमदार म्हणाले, भाजपने आमच्याशी चर्चा न करताच मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणे बाकी आहे. असे असताना जागांबाबत परस्पर एकतर्फी विधाने केल्याने अविश्वास निर्माण होईल. भाजपच्या या डावपेचाबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले. शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार आहे का, असे विचारता ते आमदार म्हणाले, कोण म्हणतो शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार नाही? संदीपान भुमरे व वेळ पडल्यास अब्दुल सत्तारही लोकसभा लढवू शकतात.
हेमंत पाटलांचे समर्थकही चिंतेत हिंगोलीचे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे राज्यातील राजकीय बंडात शिंदे सोबत गले. भाजपने मराठवाड्यातील आठही जागांवर दावा सांगितल्याने हेमंत पाटलांचे काय? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे . जालना मतदारसंघ युतीतून शिवसेनेला सोडवा , असाही सतत मागणी करणारे अर्जुन खोतकर आता शिंदे गटात असून, त्यांनीही भाजपच्या या रणनीतीवर प्रहार केला आहे .