साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : बिबट्याने आपेगाव व बीड जिल्ह्यात चार जणांवर हल्ला केल्यामुळे तो नरभक्षी झालाय का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. तर त्याने हल्ला का केला याचे निराकरण करण्यात वन व वन्यजीव विभागाचे पथक कामाला लागले आहे.
बिबट्या केव्हाही मानवावर हल्ला करीत नाही तो दोन पायाच्या माणसाला घाबरतो. परंतु त्यांनी पैठण आणि बीड येथे एकून चार जणांवर हल्ला करून त्यांना मारल्याने त्याचे कारण वनविभाग शोधत आहे. वन्य जीव तसेच वन विभागाचे पथक दोन्ही ठिकाणी ८ ते १० पिंजरे आणि विशेष शोध पथक तैनात करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या घटनांत साम्य आहे. परंतु मानव जेव्हा वाकून शेतात काम करीत असेल तेव्हा बिबट्याच्या डोळ्यात दिसणारे चित्र हे त्याच्या सावजासारखे आणि त्याच्या आवाक्यातील ठरते. मिरची तोडत असताना पैठणचा हल्ला त्याला वाचविण्यासाठी आलेल्या पित्यालाही त्यावेळी त्याने ठार केले. घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यातही झालेला हल्ल्यात दोन गंभीर प्रसंग असे दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या चार घटनांमुळे शेतकरी घाबरलेले आहेत. तो प्रत्यक्ष वन विभागाच्या पथकाला सापडत नाही तोपर्यंत सर्वांनी खबरदार घेणे गरजेचे आहे.
काही सांगता येत नाही...
बिबट्या हा मानवावर कधीच हल्ला करीत नाही परंतु त्याच्या आवाक्यातील सावज असल्यास तो त्याचे भक्ष्य समजून हल्ला करू शकतो. अन्यथा तो मानवाची चाहूल पाहून पळून जातो. मानवी वस्तीच्या आसपास तो सातत्याने राहत असल्याने तो मानसाळलेला असतो. त्याने हल्ला का केला हे शोधणे गरजेचे आहे.
- विद्या आत्रेय (वन जीव अभ्यासक)
जनतेनी सहकार्य करावे, टीम शोधात आहेत
बिबट्या नरभक्षक झाला असे म्हणता येत नाही, कारण त्याच्या सावजाआड आल्यामुळे हा प्रकार घडला असावा, ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी आवश्यक स्टाॅफ तैनात करण्यात आला आहे. पिंजरे तसेच गस्त वाढविलेली आहे. वन्य जीव तसेच वन विभाग कामाला लागलेले आहे. एकटे घराबाहेर जाऊ नये, लहान मुलांना अधिक जपावे, जनतेनीही सहकार्य करावे, आम्ही शोध घेत आहोत.
- प्रकाश महाजन (मुख्य वनसंरक्षक )