छत्रपती संभाजीनगर : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीवरून वाद पेटून वकिलांमध्ये हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले. यात एका वकिलाने दोन साथीदारांसह विजयी झालेल्या वकिलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात फायटरने वार केले. १३ जुलै रोजी सकाळी १०:४५ वाजता भावसिंगपुऱ्यात घडलेल्या घटनेप्रकरणी बबलू त्रिभुवन, ॲड. रवींद्र झाबाजी तायडे (रा. निसर्ग कॉलनी) सह अन्य एकावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ॲड. सचिन सखाराम आगरकर (३६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा वकील संघाची निवडणूक त्यांनी लढवली होती. यात सचिन विजयी होत विरोधी उमेदवार ॲड. रवींद्र पराभूत झाले. याचा राग मनात धरून रवींद्र यांनी बबलू व अन्य एका साथीदारासह १३ जुलै रोजी सचिन यांना भावसिंगपुऱ्यात थांबवले. आरोपी बबलूने त्यांच्या डोक्यात फायटरने वार करत जखमी केले. त्यानंतर रवींद्रने 'तुझ्यामुळे मी निवडणूक हरलो' असे म्हणत पुन्हा कोर्टात दिसलास तर जिवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयात उपचार घेऊन सचिन यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.