- श्रीकांत पोफळेकरमाड : अल्पवयीन विद्यार्थिनीला फुस लावून पळवून नेलेल्या शिक्षकाला करमाड पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे अखेर भोपाळ येथील नेमवार तालुक्यातील हंडीया येथून बुधवारी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांना बघताच आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून नर्मदा नदी पात्रात उडी घेतली होती. पाण्यात उडी मारलेल्या शिक्षकाला व विद्यार्थ्यांनीला स्वतःचा जीव धोक्यात घालून बीट अंमलदार दादाराव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवले.
लाडसावंगी ता.जी. छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी संगणक प्रशिक्षण केंद्रावर शिकवणीस येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने लाडसावंगी येथून पळवून नेल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. आरोपी शिक्षक महेंद्र त्रिंबक साठे (४२, ह.मु. करमाड ता. संभाजीनगर) असे शिक्षकाचे नाव आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यात या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होता. तेव्हापासून करमाड पोलीस आरोपीच्या मागावर होते. सायबर सेलचे पोलीस योगेश तलमरे यांच्या तांत्रिक मदतीने करमाड पोलीस ठाण्याचे एक पथक ४ जुलै पासून गोपनीय पद्धतीने आरोपीच्या मार्गावर होते. तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास भोपाळ येथील नेमवार गावच्या मंदिरापर्यंत पोहोचला.
बुधवारी करमाड पोलिसांच्या पथकास नदीच्या पायऱ्यावर बसलेला शिक्षक व अल्पवयीन मुलगी नजरेस पडले. पोलिसांना बघताच आरोपी महेंद्र साठे याने विषारी द्रव्य तोंडात घेऊन पाण्यात उडी मारली. हे पाहून अल्पवयीन मुलीने देखील पाण्यात उडी मारली. यावेळी करमाड पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार दादाराव पवार यांनी नदीत पाण्यात उडी मारली. अल्पवयीन मुलीला पोहता येत नसल्याने तिने पवार यांच्या गळ्याला मिठी मारली, त्यामुळे दादा पवार हे देखील पाण्यात बुडायला लागले. मात्र, त्यांनी प्रसंगावधान मुलीला वाचवत काठावर आणले. पोउपनि रामेश्वर ढाकणे व जयसिंग नागलोत यांनी तिला बाहेर काढले. दरम्यान, एका स्थानिक मुलाच्या मदतीने बीट जमादार पवार यांनी आरोपी महिंद्र साठे याला देखील पाण्याच्या बाहेर काढले. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र विषारी द्रव्य शरीरात भिनले नव्हते.
स्वतःचा जीव धोक्यात घालून पोहता येत नसलेल्या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचवणाऱ्या दादाराव पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोन दिवसात सोळाशे किमी चा प्रवास करून करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई पार पाडली. जिल्हास्तरीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फक्त या मोहिमेबद्दल कल्पना होती. सदर कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे बीट अंमलदार दादाराव पवार जयसिंग नागलोत स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र खंदारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.