नांदेड : सध्या उन्हाळी ज्वारी काढणीला सुरुवात झाली असून नवामोंढा बाजारात ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. मात्र पांढर्याशुभ्र असलेल्या ज्वारीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढत्या खत-बियाणाच्या किमती तसेच निंदणी-खुरपणी, कोळपणी आदी ज्वारीला लागणारा लागवडी खर्च वजा करता शेतकर्यांच्या पदरात कडब्याच्या पेंड्याशिवाय काही पडेल की, नाही हे सांगणे कठीण आहे. गत तीन वर्षांपूर्वी नांदेडच्या बाजारात ज्वारीला १८०० रुपये ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता, तर टाळकी ज्वारी ३८०० ते ४ हजार रुपयापर्यंत पोहोचली होती. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली, मात्र शेतकर्यांना चांगला दाम मिळाल्याने ज्वारी उत्पादकांना दिलासा मिळाला होता. गतवर्षी ज्वारीचे दर प्रतिक्विंटलपर्यंत १२०० रुपयापर्यंत होते, मात्र केंद्र ़शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत अल्प प्रमाणात वाढ केल्याने यंदा ज्वारीचे भाव १२०० ते १३५० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा भूगर्भातील पाणीपातळी वाढली. यामुळे रबी व उन्हाळी हंगामातील गव्हासह उन्हाळी ज्वारीच्या परेणीक्षेत्रात वाढ झाली. यामुळे मोंढा बाजारात सध्या आवक कमी असली तरी येत्या काही दिवसात वाढेल, परंतु दर वाढण्याची शक्यता कमी दिसते. ( प्रतिनिधी )
ज्वारीचे भाव १३५० रुपयांवर
By admin | Updated: May 17, 2014 01:06 IST