छत्रपती संभाजीनगर : हातातील घड्याळ बिघडले तर कारागीर दुरुस्त करतो. पण, जीवनाचे घड्याळ बिघडले तर त्यास सुधारण्याचे एकमेव साधन म्हणजे जिनवाणी होय, असा आत्मजागृतीचा संदेश उपप्रवर्तनी सुमनप्रभाजी म. सा. यांनी दिला. आत्मशुद्धी, आत्मकल्याण आणि क्षमेचा संदेश देणाऱ्या, जैन धर्माच्या सर्वांत महत्त्वाच्या पर्युषण पर्वाला बुधवारी महावीर भवन येथे सुरुवात झाली. पर्युषण पर्वाचा मुख्य उद्देश आत्म्याला शुद्ध करणे हाच असल्याचे साध्वीजींनी नमूद केले.
पर्यूषण पर्वासोबत आजपासूनच महावीर भवनात अष्टदिवसीय नवकार जपानुष्ठानाला सुरुवात झाली. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत जप केला जात आहे. या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे, असे आवाहन वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष झुंबरलाल पगारिया, मिठालाल कांकरिया यांनी केले.
पर्युषण का प्राण- क्षमा का दानपर्युषण पर्वा अंतर्गत दररोज एका विषयावर साध्वीजींचे प्रवचन होत आहे. बुधवारी २७ ऑगस्टला ‘पर्युषण का प्राण-क्षमा का दान’ या प्रवचनाने या पर्युषण पर्वाची सांगता होणार आहे. दररोज सकाळी ६:३० ते ७ प्रार्थना, ८:३० ते ९ वाजेदरम्यान अंतगड सूत्र वाचन व ९ ते १० या वेळेत प्रवचन, दुपारी १ ते २ वाजता नंदीसूत्र, २:१५ ते २:४५ वाजता स्पर्धा, २.४५ ते ४.४५ वाजेदरम्यान कल्यसूत्र-सुखविपाकसूत्र स्वाध्याय व सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण असे कार्यक्रम होत आहे.