जालना : येथील ‘साहेब बना अभियान’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त १ एप्रिल रोजी जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अॅड. कैलास रत्नपारखे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अॅड. रत्नपारखे म्हणाले की, गत पाच वर्षांपासून डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या प्रबोधनपर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा १ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे संमेलन होत आहे. याचे उद्घाटन नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक रविचंद्र हडसनकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षण परिषदेचे संचालक महावीर माने उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी भारत कदम, लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक प्रवीण मोरे, विस्तार अधिकारी स्रेहलता सोळुंके, डॉ. मीना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के यांची उपस्थिती राहणार आहे. या कविसंमेलनात डॉ. अनिल काळबांडे, प्रा. बसवराज कोरे, शम्स जालनवी, अॅड. प्रशांत आर्सुड, सुहास पोतदार, सुलक्षणा लांडगे, विजय जाधव, वर्षा वटावकर, अच्युत मोरे, मनीषा कबाडे, डॉ. देवीदास पाटोळे, देविका पारखे आदी कवी आपल्या कसदार कविता यावेळी सादर करणार आहेत. गत पाच वर्षांपासून हे संमेलन यशस्वी होत आहे. यंदाही प्रसिद्धी कवी आपल्या परिवर्तनवादी कविता सादर करणार आहेत. दरम्यान, अॅड. रत्नपारखे यांनी मराठवाडा साहित्य संमेलन पुढे ढकलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला व संमेलन एकत्रच येत आहेत. व्याख्यानमालेस ३७ वर्षे झाली असून, जुनी व्याख्यानमाला आहे. त्याचबरोबर छोटी छोटी राज्ये व्हावीत असेही मत रत्नपारखे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवणे सुलभ जाऊ शकते, असेही रत्नपारखे म्हणाले. (प्रतिनिधी)
जालना शहरात जयभीम कविसंमेलन रंगणार
By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST