छत्रपती संभाजीनगर : कलावंतही समाजाचाच एक भाग असतात. कोणी डाव्या, तर कोणी उजव्या विचारसरणीचे असतात. यातील कोणी भीतीपोटी सडेतोड व्यक्त होत नाही, तर काहींना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार हवे असतात. ही वस्तुस्थिती असल्याचे अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की, कलावंतांनी कोणालाही न घाबरता व्यक्त झाले पाहिजे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ वे साहित्य संमेलनात रविवारी शेवटच्या दिवशी 'समाज, साहित्य, चित्रपट व मालिका' या विषयावर आयोजित परिसंवादात अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी आणि लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सहभाग नोंदविला. रेडिओ जॉकी (आर. जे.) प्रेषित रुद्रावार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. समाज, साहित्य, चित्रपट व मालिकांमधून समााजाचे प्रतिबिंब दिसते का, असा प्रश्न केला. यावर चंदनशिवे म्हणाले की, संगीत शारदा नाटकातून अल्पवयीन मुलीचे तिच्यापेक्षा तिप्पट वयाच्या वरासोबत केलेल्या लग्नावर भाष्य करण्यात आले होते. तर आताच्या काळात चित्रपट, मालिकांमधून फार कमी समाजाचे चित्रण दाखविण्यात येते, हे दुर्दैव आहे. प्रत्येक समाजाच्या भावनांचे चित्रण उमटले पाहिजे, असे आम्हालाही वाटते.
गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या की, यासाठी सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना ‘फिल्म आणि नाटक साक्षर’ करावे लागेल. हे काम प्रत्येक कलावंतास करावे लागेल. बऱ्याचदा समाजाला कळत नाही की, या आपल्याच समस्या आहेत. कडक निर्बंध असताना इराणी सिनेमा चांगला फोफावला आहे. आपल्याकडेही सेन्सॉरशिप आहे. मात्र अशा परिस्थितीतही सत्य शोधत राहावे लागेल, असे गीतांजली म्हणाल्या.