छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील १५ लाख १६ हजार ८१९ महसूल व शैक्षणिक अभिलेख जिल्हा प्रशासनाच्या पथकाने तपासले आहेत. यात कुणबी अशी नोंद असलेले फक्त २९७ पुरावे आढळले आहेत. जिल्ह्यातील अभिलेख तपासण्याचे काम जवळपास संपत आले आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. ही सगळी माहिती विभागीय प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ७० लाखांहून अधिक अभिलेख तपासणीमध्ये ६ हजार अभिलेखांमध्ये कुणबी नोंद आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाच्या आदेशाने विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी असलेले महसुली व इतर दस्त शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील कुणबी नोंदी आढळलेल्या अभिलेखाचा अहवाल शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मुख्य समितीकडे सादर केला जाईल. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आजवर अनेक आंदोलने झाली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस केलेल्या आंदोलनामुळे पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. निजामकालीन नोंदींच्या आधारे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. त्यानंतर हैदराबादमधील निजामकालीन अभिलेख तपासणीसाठी पथक गेले होते. या पथकाने १२०० सनदींचा अहवाल शासन नियुक्त आरक्षण समितीकडे सादर केला आहे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रवेश निर्गम उतारे, सातबारा व अन्य कागदपत्रे तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. धाराशिवचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य संकलन समितीची स्थापना केली असून एका फॉरमॅटमध्ये नोंदी घेतल्या जात आहेत. मराठवाड्यातील ८० लाखांहून अधिक अभिलेखांमध्ये सर्व जिल्ह्यातील अभिलेखनिहाय किती नोंदी आढळल्या याचा गोपनीय अहवाल समितीकडे सादर केला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळलेले पुरावे...महसूल पुरावे : ४३शालेय पुरावे : ६४कारागृह : १४जात वैधता प्रमाणपत्र : १५१भूमी अभिलेख व इतर : २५एकूण : २९७