छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन उड्डाणपुलापासून महावीर चौकापर्यंत महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. या मोहिमेत मागील अनेक दशकांच्या साक्षीदार असलेल्या लहान-मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यात रेल्वेस्टेशन गेटसमोरील जनता हॉटेलही पाडले. रुंदीकरणात बाधित होणारी बहुतांश बांधकामे अनधिकृत होती. दिवसभरात ११९ मालमत्ता पाडण्यात आल्या.
बुधवारी सकाळी अचानक मनपाने कोणतीही घोषणा न करता रेल्वेस्टेशन उड्डाणपूल ते महावीर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. सकाळीच रेल्वेस्टेशन चौकात मनपा, पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलासमोरील रस्ता नवीन विकास आराखड्यानुसार ३५ मीटर रुंद आहे. त्यानुसार मार्किंग केली. मालमत्ताधारकांना सामानही काढण्यास वेळ दिला नाही. सुरुवात प्रतिष्ठित जनता हॉटेलपासून करण्यात आली. माजी नगरसेवक शेख रशीद यांच्या भावाचे हे हॉटेल होते. शेजारील एक इमारत रहिवासी असल्याने त्यातील दुकाने पाडण्यात आली. हॉटेलला लागूनच धार्मिकस्थळ असून, धार्मिकस्थळाच्या समोर लहान-मोठी दुकाने होती. ही दुकानेदेखील पाडण्यात आली. आरटीओ ऑफिस समोर कारवाई केली. त्यानंतर काही मालमत्ताधारकांच्या संरक्षण भिंती पाडल्या. पदमपुरा येथे रस्त्यावरच लहान-मोठी दुकाने मोठ्या प्रमाणात होती. ही दुकाने एका बाजूने साडेसतरा मीटरच्या आत येत असल्याने जेसीबीच्या साहाय्याने ती पाडण्यात आली.
माजी महापौर गजानन बारवाल यांनी, बाधित मालमत्ता नागरिक स्वत: काढून घेत असल्याचे आश्वासन प्रशासनाला दिले. ज्या भागातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत तो भाग गावठाणचा आहे, असे त्यांनी नमूद केले. पंचवटी चौकापर्यंत महापालिकेच्या दोन पथकांनी कारवाई केली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईसाठी बुधवारीही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रचंड वाहतूक कोंडी१) बुधवारी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ पर्यंत रेल्वेस्टेशनकडून येणारी सर्व वाहने उड्डाणपुलावर अडकून पडत होती. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांना वारंवार कसरत करावी लागत होती.२) सकाळपासूनच शहरात रिमझिम सरी सुरू होत्या. मनपाने कारवाई सुरू करताना पावसाचा जोर वाढला. भिजतच मनपा, पोलिस अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत होते.३) मनपाने रेल्वेस्टेशन येथे इमारती पाडताच ताबडतोब मलबा उचलून घेतला. त्यामुळे दुपारपर्यंत उड्डाणपूल, रेल्वेस्टेशन कॉर्नर मोकळा झाला होता.