छत्रपती संभाजीनगर : आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते. माझ्यासाठी हीच बाब कायम महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम सिने दिग्दर्शिका फराह खान यांनी केले. ‘कभी हा कभी ना’ चित्रपट माझ्यासाठी जसा कोरिओग्राफर म्हणून महत्त्वाचा ठरला तसाच ओम शांती ओम डायरेक्टर म्हणून महत्त्वाचा होता, असेही त्यांनी नमूद केले.
१५ जानेवारीपासून प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे सुरू असलेल्या दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी दिग्दर्शिका फराह खान यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी त्यांची प्रकट मुलाखत (मास्टर क्लास) सिनेदिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी घेतली. त्या म्हणाल्या की, चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे गरजेचे असते. गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे जाणे गरजेचे आहे. आयटम साँग पेक्षा अशी गाणी करणे मला जास्त आवडेल, असे त्यांनी नमूद केले. स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात येत असते. कोरिओग्राफी आणि डायरेक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती. कोरिओग्राफर म्हणून काम करत असले तरी दिग्दर्शक म्हणूनच काम करायचे, हे ठरवले होते. त्यामुळे ‘ओम शांती ओम’ सारखा चित्रपट केवळ चौदा दिवसांत लिहून पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते.
अपयशाला खचून जाऊ नका...चार चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील एकाला अपयश आले, मात्र अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने कामाला लागले तरच आपण पुढे जाऊ शकतो. यामुळे एका अपयशाने खचून जाऊ नका, असा सल्ला त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना दिला.