जालना : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. पदे येतात आणि जातात, परंतु राज्यातील बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तिकडे मालक आणि नोकर अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेकजण आमच्याकडे येत आहेत. जाणाऱ्यांना कचरा म्हणत आरोप कराल तर राहिलेल्या २० मधील शून्य निघून जाईल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
शिंदेसेनेच्या आभार दौऱ्यास शनिवारी जालना येथून प्रारंभ झाला. यानिमित्त आयोजित सभेस संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर, आ. हिकमत उढाण, अभिमन्यू खोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींसह सर्वांचेच आभार मानण्यासाठी आपण इथे आलो आहे. विधानसभेत मिळालेले यश आपण बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करीत आहोत. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचविण्यासाठी आम्ही उठाव करीत जनतेच्या मनातील सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करतानाही सावत्र भावांनी त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. योजना बंद पडेल, अशी अफवा उठविली. परंतु आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. सत्ता आल्यानंतर योजना चालूच ठेवली नाही तर खंड न पडता लाडक्या बहिणींचे अनुदानही अदा केले.
डेडिकेटेड टू कॉमन मॅनमी उपमुख्यमंत्री अर्थात डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा पद्धतीने मी काम करणार आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबावर जनतेचा अधिकार असून, शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेत आपण राहणार आहोत. आता गाव तेथे शिवसेना, घर तेथे शिवसैनिक या पद्धतीने संघटन वाढवा, शिवसैनिकांना जपा, असा सल्लाही शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा महायुतीचा भगवा फडकवावा, असेही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दाखविले काळे झेंडेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जालना शहरातील मंठा चौफुली भागात आला असता, युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावेत, मोती तलावात तथागत गौतम बुद्धांचा पुतळा बसवावा आदींसह विविध मागण्यांसाठीही निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष शेषराव जाधव, दीपक गायकवाड, सूरज चक्रे, संतोष वाघमारे, सुखदेव उगले आदी उपस्थित होते.