छत्रपती संभाजीनगर : शारीरिक, मानसिक छळासह जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याप्रकरणी विवाहितेने २०२२मध्ये पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यादरम्यान पती विदेशात पसार झाला. न्यायालयाने वारंवार समन्स जारी केले. त्यालाही प्रतिसाद दिला नाही. मात्र, पोलिसांनी काढलेल्या लूक आऊट नोटीसमुळे आरोपी कुणाल कचरुलाल धुमाळ (३०, रा. श्रीकृष्णनगर, एन-६) हा देशात परतताच त्याला मुंबई विमानतळावर अडवण्यात आले. त्यानंतर सिडको पोलिसांनी धाव घेत त्याला अटक केली.
३३ वर्षीय तरुणीने याप्रकरणी ७ ऑक्टोबर २०२२ रोजी कुणालसह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार, २०१० पासूनच्या प्रेमसंबंधातून एप्रिल २०२१मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर तरुणीचा छळ सुरू झाला. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. या छळामुळे तरुणीचा गर्भपात झाला. यादरम्यान कुणालला साऊथ आफ्रिकेत कंट्री मॅनेजर म्हणून नोकरी लागली होती.
पोलिसांकडे तक्रार, समेटाचे आश्वासनतरुणीने २०२२मध्ये छळाविषयी सिडको पेालिसांकडे तक्रार केली. मात्र, नातेवाइकांनी मध्यस्ती करून समेट घडवून आणला. तेव्हा कुणालने पत्नीला आफ्रिकेत नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो एकटाच निघून गेला. ऑक्टोबर महिन्यात तरुणीने सासरी राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करून हाकलण्यात आले. त्यानंतर कुणालवर कौटुंबीक छळासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लूक आऊट नोटीस जारीगुन्हा दाखल झाल्यापासून कुणाल विदेशातच होता. न्यायालयाने वारंवार हजर राहण्याबाबत समन्स जारी केले. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी कुणालविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. नुकताच तो देशात परतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विमानतळ प्रशासनाला अलर्ट प्राप्त झाला. त्यांनी त्याला ताब्यात घेत शहर पेालिसांशी संपर्क साधला. ही बाब कळताच सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या सूचनेवरून सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार विशाल सोनवणे व देवा साबळे यांनी धाव घेत त्याला विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याची १२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.