पैठण:मराठा आरक्षणासाठी रविवारी तोंडोळी (ता. पैठण) येथे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा फोटो असलेले होर्डिंग व स्वतःचे मतदान कार्ड जाळून युवकांनी राज्य व केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला. लोहगाव येथे होणाऱ्या एका खासगी कार्यक्रमाचे होर्डिंग तोंडोळी परिसरात लावण्यात आले होते, हे होर्डिंग खाली काढून युवकांनी रविवारी जाळून टाकले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पैठण तालुक्यातील काही गावात राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
रविवार(दि.२२ ऑक्टोंबर) रोजी सकाळी लोहगाव ता पैठण येथे एका वॉटर पार्कचे उदघाटन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होते. या कार्यक्रमाचे लोहगाव परिसरातील विविध रस्त्यावर होर्डिंग लावण्यात आलेले होते. या होर्डिंगवर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो छापण्यात आलेले होते.
मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश करु देणार नाही अशी भूमिका घेत तोंडोळी येथील युवकांनीमतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी तोंडोळी येथे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा फोटो असलेले होर्डिंग व स्वतःचे मतदान कार्ड जाळून संतप्त युवकांनी घोषणाबाजी करत तिव्र शब्दात राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.