छत्रपती संभाजीनगर : एका मद्यधुंद कारचालकाने रविवारी रात्री ०९:३० ते १०:०० वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात धुमाकूळ घातला. पदमपुरा परिसरातील होळकर चौकात एका पादचारी महिलेसह मुलीला उडविले. तेथून पुढे पंचवटी चौक, महावीर चौक, कार्तिकी सिग्नल, सावरकर चौक, बंडू वैद्य चौक आणि पुन्हा सावरकर चौकापर्यंत तीन वाहनांना उडविले. अनसाबाई भगीरथ बरंडवाल (४८, रा. पदमपुरा) या जखमी आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी कारचालकास ताब्यात घेतले.
संकेत शंकर अंभोरे (२८, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), असे मद्यधुंद कारचालकाचे नाव आहे. प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांचा तो मुलगा असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली. प्रकाश राजू कटारे (रा. पदमपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पदमपुरा येथे गोकुळाष्टमीनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आटोपून ते स्वत:, श्याम रमंडवाल, रोहिदास बताडे आणि विकी बताडे हे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी होळकर चौकाकडून सुसाट कार (एमएच २० एफपी ९०६६) आली. या कारचालकाने अनसाबाई बरंडवाल या पादचारी महिलेसह एका मुलीला उडविले आणि न थांबता तो पंचवटी चौकाच्या दिशेने सुसाट गेला.
तेथे उभ्या तरुणांपैकी दोघे जण जखमींजवळ थांबले. इतरांनी दुचाकीने कारचा पाठलाग सुरू केला. कार महावीर चौकमार्गे कार्तिकी सिग्नलकडे निघाली. कार्तिकी चौकात कारचालकाने समोरील कारला (एमएच २० एचबी ५०१६) धडक दिली. पुढे सावरकर चौकमार्गे बंडू वैद्य चौक गाठला. तेथे दुचाकीला (एमएच २० एफए ७०५६) उडविले. यू टर्न घेऊन पुन्हा सावरकर चौकातील पांडे हॉस्पिटलच्या आधी स्कॉर्पिओला (एमएच २० डीजे ७२४३) उडविले. ही धडक एवढी जोरात होती की, त्याच्या कारच्या एअर बॅग उघडल्या. तेथे ही कार बंद पडली आणि पुढील अपघात टळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शेकडो नागरिक पोलिस ठाण्यातया कारचालकाने वर्दळीच्या मार्गावर आणि गर्दीच्या चौकांत अक्षरशः धुमाकूळ घातला. नागरिकांनी डायल ११२ वर कॉल करून अपघाताची माहिती दिली. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने हे तत्काळ घटनास्थळी आले. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी, तक्रारी आणि फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. यावेळीशेकडो नागरिक पोलिस ठाण्यात जमा झाले होते.