छत्रपती संभाजीनगर : भाजीत केस निघाल्याच्या कारणावरून एका निर्दयी पतीने पत्नीला जखमी होईपर्यंत मारहाण केली. दारूच्या आहारी गेलेल्या पतीसह सासरच्यांकडून सुरू असलेला छळ असह्य झाल्याने २५ वर्षीय ईश्वरी राजू भुजंग-बनकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी तिच्या शवविच्छेदनावेळी कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आणि सासरच्यांवर कठोर कारवाईची मागणी करीत घाटीत ठिय्या दिला. त्यानंतर छावणी पोलिसांनी तत्काळ पतीसह सात जणांना अटक केली.
२५ वर्षीय ईश्वरीचा २८ जून २०२० रोजी अजय अशोक बनकर याच्यासोबत विवाह झाला. ते भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनीत राहत होते. काही महिने चांगली वागणूक दिल्यानंतर अजय याने दारूच्या आहारी जाऊन पत्नीचा छळ सुरू केला. रोज दारू पिऊन घरी येत तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत असे. सासरकडील अन्य नातेवाईकही सातत्याने घरी येऊन त्रास देत होते. ईश्वरीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यांनी दोघांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र, अजयच्या वागण्यात बदल झाला नाही.
लाखोंचा हुंडा, दागिने देऊनही छळईश्वरीचे वडील राजू भुजंग यांनी मुलीचे लग्न थाटामाटात लावले होते. अजयला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळ्याची साखळी, मुलीसाठी ५ तोळे सोने, २ लाख रुपये हुंडा, फ्रिज, कूलर, सोफा व सर्व घरगुती साहित्य दिले होते. तरीही अजय माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. त्याने विकत घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही तिच्या वडिलांनाच भरण्याची मागणी करीत होता.
यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्नअजयसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून ईश्वरीने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी बैठक घेऊन वाद मिटवून तिला पुन्हा सासरी पाठवले. ६ एप्रिलला रात्री ११ वाजता जेवणात केस निघाल्याच्या कारणावरून अजयने तिला मारहाण केली. ईश्वरीने रात्रभर वेदना सहन केल्या. ७ एप्रिलला त्याने पुन्हा मारहाण करीत गंभीर आरोप केले. त्याचा सततचा त्रास असह्य झाल्याने अखेर ईश्वरीने मंगळवारी आत्महत्या केली.
बुधवारी संताप; आरोपींना अटकईश्वरीच्या माहेरकडील नातेवाइकांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला. बुधवारी ईश्वरीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटीत ठिय्या देत संताप व्यक्त केला. छावणी ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी पती अजय बनकर (३०, रा. श्रावस्ती कॉलनी) याच्यासह दिनेश दिलीप बनकर (३५), दिलीप दशरथ बनकर, चंद्रमणी दशरथ बनकर, छाया चंद्रमणी बनकर, आशिष चंद्रमणी बनकर, गणेश दिलीप बनकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. अजय हा मनपाच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान आहे. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Web Summary : A woman in Sambhajinagar died by suicide after enduring relentless abuse from her husband and in-laws. The husband, enraged over a hair found in food, assaulted her, leading to her death. Police arrested seven accused.
Web Summary : संभाजीनगर में एक महिला ने पति और ससुराल वालों से लगातार दुर्व्यवहार के बाद आत्महत्या कर ली। खाने में बाल मिलने पर गुस्साए पति ने उसे पीटा, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने सात आरोपियों को गिरफ्तार किया।