वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एक्स-सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे व्यावसायिक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, कचरा संकलन करणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
उद्योगनगरीतील केर-कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी उद्योजक संघटनांनी दबाव वाढविल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर कचऱ्यावर प्रकिया करण्याचा प्रकल्प सुरू केला. इंदूरची महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी औद्योगिक क्षेत्रात कचरा संकलन करून या कचऱ्यावर प्रकिया करते. मात्र, कंपनीकडून नियमितपणे कचरा संकलित केला जात नसल्यामुळे औद्योगिक क्षेत्र व बजाजनगरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. उद्योगनगरीत एक्स-सेक्टरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून केरकचरा साचलेला आहे. पंढरपूरच्या भाजीमंडईतील विक्रेते या सेक्टरमध्ये केरकचरा आणून टाकतात. याशिवाय हॉटेल, हातगाडीवर व्यवसाय करणारे, तसेच फळविक्रेतेही याठिकाणी केरकचरा आणून टाकतात. मोकळ्या भूखंडावर टाकलेला हा केरकचरा उचलला जात नसल्यामुळे जागेवरच सडतो व सर्वत्र दुर्गंधी पसरते. कचऱ्याच्या ढिगामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. या सेक्टरमध्ये बँक, ट्रॉन्स्पोर्ट कार्यालय, तसेच विविध दुकाने असल्यामुळे मोठी गर्दी असते.
कचरा संकलनाकडे कंपनीचे दुर्लक्ष
औद्योगिक क्षेत्रातील एक्स-सेक्टरमधील भूखंडावरील कचरा उचलण्याची तसदी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून घेतली जात नसल्याची ओरड होत आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प उभा करूनही कचऱ्याची समस्या निकाली निघत नसल्यामुळे व्यावसायिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी संबधित कंपनीला औद्योगिक क्षेत्रातील संपूर्ण कचरा उचलण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे सुंदर बाबू यांनी या परिसरातील कचरा संकलित करून साफसफाई केली जाणार असल्याचे सांगितले.
फोटो ओळ-
वाळूज एमआयडीसीतील एक्स-सेक्टरमध्ये अशा प्रकारे केरकचरा साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.
----------------------