आरोग्य केंद्राला ठोकले टाळे !

By Admin | Updated: August 27, 2016 00:07 IST2016-08-27T00:07:45+5:302016-08-27T00:07:45+5:30

मेळघाटात पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्य सेवा सज्ज ठेवण्याचा आदेश असताना डॉक्टरांअभावी ....

Health Center | आरोग्य केंद्राला ठोकले टाळे !

आरोग्य केंद्राला ठोकले टाळे !

आदिवासी संतप्त : रुग्ण वाऱ्यावर, डॉक्टर बेपत्ता, प्रशासन झोपेत
चिखलदरा : मेळघाटात पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्य सेवा सज्ज ठेवण्याचा आदेश असताना डॉक्टरांअभावी प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडल्याने टेंब्रुसोंडा येथील आदिवासींनी गुरुवारी सायंकाळी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
गुरुवार २५ आॅगस्ट रोजी टेंब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. ओपीडीमध्ये किमान २५ रुग्ण व आडनदी येथील आश्रमशाळेतून १४ मुले तपासणी वजा उपचारासाठी आले होते. परंतु तासन्तास ताटकळत बसलेल्या या रुग्णांची तपासणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली नाही. टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार पाहता येथील सरपंच भुलाबाई बेठे, उपसरपंच सुरेश खडके, रामजी सावलकर, नत्थू खडके, बन्सी जामकर, जी. पी. काळे, भोयर, एस. पी. गायगोले, कमला दारसिंबे, एस. एम. सुरजुसे, रमेश बेलसरे, जासेसी मावस्कर, सुलताने, संगीता कास्देकर यांच्यासह संतप्त गावकऱ्यांनी व आदिवासी नागरिकांनी कुलूप ठोकून प्रशासनाला तशी सूचना दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

निवेदनाला केराची टोपली
टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास ४० गावांचा भार असून येथील वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणाला गेल्याने चार महिन्यांपासून आरोग्य केंद्राचा कारभार भगवानभरोसे सुरू आहे. यासंदर्भात प्रशासनाला ग्रामपंचायतीतर्फे पत्र देण्यात आले. मात्र मेळघाटसारख्या भागाला प्रथम प्राधान्य न दिल्याने नागरिकांमध्ये संताप खदखदत होता. त्याचा उद्रेक गुरुवारी सायंकाळी गावकऱ्यांनी कुलूप ठोकून दूर केला.

प्रशासन हादरले, टाळे उघडले
टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला गावकऱ्यांनीच आरोग्य केंद्र पांढरा हत्ती ठरल्याने टाळे लावल्याची माहिती पोहचताच प्रशासनात खळबळ माजली होती. रात्री ११ वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश प्रधान आणि संबंधित अधिकाऱ्यांनी टेंब्रुसोंडा येथे येवून नागरिकांची समजूत काढली व आठ तासानंतर आरोग्य केंद्राचे टाळे उघडण्यात आले. आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून गुन्हे दाखल करण्याची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांची कोंडी केली.

Web Title: Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.