औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस सहशिक्षिका म्हणून नियुक्ती देणे आणि शिक्षणाधिकाऱ्याशी संगनमत करून खोटा वैयक्तिक मान्यतेचा आदेश दिल्याच्या गुन्ह्यात वेदांतनगर पोलिसांनी फुलंब्री येथील भारतमाता विद्यालयाच्या फरार मुख्याध्यापकाला ३ फेब्रुवारी रोजी अटक केली.
न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सुल कारागृहात रवानगी केली. योगेश श्रीकृष्ण सांबरे असे अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गतवर्षी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाला होता. यातील आरोपी माजी शिक्षणाधिकारी चव्हाण आणि संस्थाचालक इंगळेला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, आरोपी योगेश श्रीकृष्ण सांबरे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्यांची रवानगी हर्सुल जेलमध्ये केली.