छत्रपती संभाजीनगर : घरी आलेल्या नातेवाइकाने कौटुंबिक वादातून गौतम महादेव सदावर्ते यांची क्रूरपणे गळा आवळून हत्या केली. गौतम यांनी गळफास घेतल्याचा बनाव आरोपी विलास पांडव याने रचला होता. पण शवविच्छेदन अहवालानंतर सत्य उघडकीस आले. आरोपी गजाआड झाला आहे.
सदावर्ते कुटुंबासह न्यायनगरमध्ये राहत. खाजगी काम करून गौतम (४६) कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त त्यांचा नातेवाईक असलेला विलास पांडव रविवारी शहरात आला होता. दिवसभर ते एकमेकांसोबत होते. सायंकाळी गौतम यांचे कुटुंबिय बाहेर गेले होते. त्यादरम्यान गौतम व विलास दोघे घरीच होते. त्यांनी सोबत जेवण देखील केले. मध्यरात्री १ वाजता कुटुंब घरी परतल्यानंतर गौतम बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मंगळवारी सकाळी पुंडलिकनगरचे निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घाटीत जाऊन डॉक्टरांशी देखील चर्चा केली. प्राथमिक माहितीत विलासने गौतम यांनी गळफास घेतल्याचे सांगत घुमजाव केले. मात्र सायंकाळी शवविच्छेदन अहवालात गौतम यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. विलासवर संशय असल्याने त्याला आधीच ताब्यात घेण्यात आले होते. कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांत नेमका वाद कशावरून झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.