छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील गट क्रमांक २१६, २१७ मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७०० घरे बांधण्यात येणार आहेत. या जागेवरील अतिक्रमणधारकांना महापालिकेने बेघर केले. संबंधित नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड मांडून आंदोलन सुरू केले. याची दखल घेत मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संबंधितांना १८ महिने प्रत्येकी दाेन हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेतला.
जी. श्रीकांत यांनी पत्रकारांना सांगितले की, हर्सूल येथे गृहप्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा दिली. या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याचे नंतर लक्षात आले. अतिक्रमण केलेल्या नागरिकांना वारंवार विनंती केली. आवास योजनेत प्राधान्याने घरे देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही अतिक्रमण केलेल्यांनी ऐकून घेतले नाही. त्यामुळे कारवाई केली. आता नागरिकांनी आंदोलन सुरू केले. गृहप्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदाराला १८ महिन्यांची मुदत दिली आहे. ७०० घरे बांधली जातील. त्यामध्ये अतिक्रमण केलेल्या नागरिकांसाठी ५ टक्के आरक्षणही ठेवण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत २ हजार रुपये दरमहा भाडेही मनपा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हा निर्णय फक्त हर्सूल येथील अतिक्रमणधारकांसाठी असेल. अन्यत्र हा नियम लावला जाणार नाही, असेही सांगण्यात आले.
१८० अतिक्रमणधारकहर्सूल येथे १८० कुटुंबांनी अतिक्रमण केले होते. २४ मार्चला महापालिकेने सर्व झोपड्या हटविल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परत मलबा उचलण्यासाठी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक गेल्यावर त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती.
दरमहा ३ लाख ६० हजार १) हर्सूल येथील अतिक्रमणधारकांना मानवीय दृष्टिकोनातून मनपा दरमहा २ हजार रुपये देणार आहे. २) १८० अतिक्रमणधारकांना दरमहा ३ लाख ६० हजार रुपये, तर १८ महिन्यांचे ६४ लाख ८० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. ३) महापालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच निर्णय आहे. यापूर्वी अतिक्रमणधारकांना जमिनी दिल्या, घरभाडे कधीच दिले नव्हते.