छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलात २१.५९ कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हर्षकुमार क्षीरसागर, त्याचे वडील अनिल व आई मनीषा अखेर घोटाळा उघडकीस आल्यापासून दहाव्या दिवशी पोलिसांच्या हाती लागले. पुणे शाखेच्या दोन पथकांनी तिघांनाही अटक करून बुधवारी शहरात आणले. त्यापैकी हर्षकुमारला दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
२१ डिसेंबर रोजी उघडकीस आलेल्या घोटाळ्याची देशभरात चर्चा झाली. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या हर्षकुमारने संकुलासाठी मिळणारा कोट्यवधींचा निधी ११ महिन्यांमध्ये लंपास केला. त्यातून शहरासह मुंबईत कोट्यवधींचे फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित दागिन्यांसह परदेशवारीवर पैसे खर्च केले. मुलासह फरार झालेल्या आई-वडिलांचा पोलिस शोध घेत होते. अखेर मंगळवारी तांत्रिक तपासातून तिघांना अटक करण्यात आली.
३६ मिनिटे चालली सुनावणीहर्षकुमारला दुपारी ३:३० वाजता आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद, उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी न्यायालयात हजर केले. जवळपास ३६ मिनिटे सरकारी पक्ष व आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी चालली. हर्षकुमारतर्फे ॲड. रामेश्वर तोतला यांनी हर्षकुमारच्या पोलिस आयुक्तांना पाठवलेल्या ७ पानी पत्राचे वाचन करून विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्यावर आरोप केले. हर्षकुमारच्या आई-वडिलांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
१२ कोटींची संपत्ती जप्ततपास पथकाने घोटाळ्यापैकी आतापर्यंत हर्षकुमार, यशोदा शेट्टी, तिचा पती जीवन विंदडा यांनी खरेदी केलेली १२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
हर्षकुमारकडून या प्रश्नांची उत्तरे हवीत...-हर्षकुमारने बनावट मेल आयडी कसा, कुठल्या डिव्हाइस (उपकरणा) वर तयार केला ?-उपसंचालकांचे मूळ पत्र कुठून मिळवले, मजकूर कोणी लिहिला ?-कंत्राटी कर्मचारी असतानाही समितीचे बँक आयडी, पासवर्ड कोणी दिले ?-ऑडिटमध्ये बँक स्टेटमेंट बदलून रिपोर्ट सादर करायला कोणी सांगितले ?-या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरप्लॅन ठरवताना कोण-कोण सहभागी होते ?