औरंगाबाद : नवीन शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून आरंभ होत असला तरी गुरुजींची शाळा मात्र, उद्यापासूनच (१३ जून) भरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच सर्व विद्यार्थी गणवेशात हजर झाले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून दोन दिवस गणवेश वाटप केले जाणार आहेत. याशिवाय शाळा परिसर तसेच वर्गखोल्यांची साफसफाई, सजावट तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी गुरुजींना करावी लागणार आहे. यापूर्वी दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वितरण केले जायचे. मात्र, यंदापासून त्यामध्ये बदल केला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेशात शाळेत आले पाहिजे. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी एक तर पालकांना शाळेत बोलावून घ्यावे किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गणवेश वाटप करायचे आहेत. त्यानुसार दहा दिवसांपूर्वीच केंद्रनिहाय गणवेशाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना १२ जूनपासून गावातील तसेच शहरातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांची यादी करावी लागणार आहे. पहिलीतील दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी गावाच्या व शाळेच्या दर्शनी फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्यामुळे दाखलपात्र विद्यार्थ्यांबद्दल पालकांमध्ये जनजागृती होईल, अशी अपेक्षा आहे. (पान २ वर) शाळा सुरू झाल्यानंतर सलग पाच दिवस शिक्षणाच्या पालखीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ४या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत दाखल करण्याबाबत आवाहन करावे. भेटी दिलेल्या पालकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात. दोन दिवस अगोदरच १३ ते १५ जून या कालावधीमध्ये शाळा सुरू होत असल्याबाबत तसेच दाखलपात्र मुलांना आणि नियमित मुलांना शाळेत पाठविण्यासाठी दवंडी देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. यासंबंधीची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. गावात फलक लेखन करून शाळा शुभारंभाबाबत सविस्तर सूचना लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पटनोंदणी व उपस्थितीचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळेच शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व समाजाच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा शुभारंभाबाबत विविध स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.