हिंगोली : एकूण ८ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होवूनही केवळ ९०० रूपयांचे अनुदान सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील कुंडलिक कोंडजी वायचाळ यांना देण्यात आले आहे. त्यामुळे किमान २ हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी वायचाळ यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वायचाळ पिंपरी येथील पैनगंगा नदीच्या काठावर सर्वे नं. ९४, ४९२, ९५ आणि ४९८ मध्ये वायचाळ यांची ८ एकर १५ गुंठे जमीन आहे. या जमिनीवरील पेरलेले हरभर्याचे पीक अवकाळी पावसानंतर पैनगंगा नदीला आलेल्या पुरात वाहून गेले होते. एवढे नुकसान होवून त्यांना नुकसान भरपाईच्या यादीमध्ये ९०० रूपयांचे अनुदान आले आहे. शेती नसणार्यांना अधिक अनुदान आल्याची तक्रार वायचाळ यांची आहे. त्यामुळे नुकसान भरपाईप्रमाणे आणि शासनाच्या नियमानुसार २ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी. अन्यथा उपोषण करणार असल्याचे वायचाळ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
आठ एकराच्या नुकसानीला ९०० रूपयांचे अनुदान
By admin | Updated: May 29, 2014 00:23 IST