छत्रपती संभाजीनगरात अवतरणार ‘अयोध्या’; ७ एकरावर शरयू घाट, मंदिराची प्रतिकृती उभारणार

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 20, 2024 03:50 PM2024-01-20T15:50:57+5:302024-01-20T15:52:01+5:30

आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती

Good news for Ram devotees; will build a replica of Ayodhya's Ram temple in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात अवतरणार ‘अयोध्या’; ७ एकरावर शरयू घाट, मंदिराची प्रतिकृती उभारणार

छत्रपती संभाजीनगरात अवतरणार ‘अयोध्या’; ७ एकरावर शरयू घाट, मंदिराची प्रतिकृती उभारणार

छत्रपती संभाजीनगर : आयुष्यात एकदा तरी ‘याचि देही याची डोळा’ अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेण्याची प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. मात्र, असे अनेक रामभक्त आहेत त्यांना अयोध्येत जाणे शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी छत्रपती संभाजीनगरातच ‘अयोध्या’च उभी राहत आहे... हे वाचून तुम्ही आश्चर्यचकीत झाला असाल. बीड बायपासवर अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे याचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल.

नागर शैलीतील श्रीराम मंदिराचे डिझाईन लोकप्रिय २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा धार्मिक सोहळा असल्याने देशातीलच नव्हे तर जगभरातील रामभक्तांचे लक्ष सध्या अयोध्येकडे लागले आहे.
अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर’ सर्वत्र भक्तप्रिय झाले आहे. हे मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनविले जात आहे. हुबेहूब तसेच फक्त लहान आकारातील श्रीराम मंदिराची निर्मिती बीड बायपासवर होत आहे.

अयोध्येतील मंदिर वास्तुकारावरच सोपविली जबाबदारी
अयोध्येतील बहुचर्चित श्रीराम मंदिराची ज्यांनी डिझाईन बनविली ते प्रमुख वास्तुकार आशिष सोमपुरा यांच्यावरच बीडबायपासवरील श्रीराम मंदिराचे डिझाईन तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा पार पडल्यावर ते डिझाईन तयार पूर्ण करणार आहेत.

१ एकरवर मंदिर उभारणार
बीड बायपासपासून जवळच मूर्तिजापूर परिसरात किराडापूरा येथील श्रीराम मंदिराची जागा आहे. तिथे डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्यावतीने ३५ एकर परिसरात मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे. त्यातील १ एकरवर श्रीराम मंदिर उभारण्यात येईल. अयोध्येतील मंदिराची छोटी प्रतिकृतीच हे मंदिर असणार आहे. मंदिरातील खांबावर जसे डिझाईन आहे तसेच हुबेहूब येथील मंदिरात करण्याचा प्रयत्न आहे. जणू भाविकांना येथे आल्यावर अयोध्येतील श्रीराम मंदिरासमोर उभे राहिल्याचा भास होईल. राजस्थानमधील मकराना मार्बलचा वापर मंदिर बांधण्यात करण्यात येणार आहे.

६ एकरवर तयार होणार शरयू घाट
अयोध्येत शरयू नदीवर मोठा उत्कृष्ट घाट बांधण्यात आला आहे. त्याच धर्तीवर शरयू घाट तयार केला जाईल १ एकर परिसरात श्रीराम मंदिर व बाजूच्या ६ एकरावर शरयू घाट बांधला जाईल. त्या जागेवर नाला आहे. त्या नाल्याला लागून घाट असेल व नाल्याचे पाणी शुद्धिकरण करण्यात येणार आहे. शरयू घाटाचे डिझाईन पुण्यातील लँडस्केपिंग विकास भोसेकर यांनी तयार केले आहे.

मंदिर उभारण्यासाठी १५ कोटींचा खर्च अपेक्षित
अयोध्येत एका चबुतऱ्यावर मंदिर उभारण्यात आले. तसेच बीड बायपास येथे चबुतरा तयार करुन त्यावर मंदिर उभारण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. एका वर्षात हे मंदिर उभारल्या जाणार आहे. त्यासाठी साधारणत: १५ कोटींपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. डॉ. अनंत पंढरे, वैद्यकीय संचालक, हेडगेवार रुग्णालय

Web Title: Good news for Ram devotees; will build a replica of Ayodhya's Ram temple in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.