तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी, तामलवाडी परिसरात गुरूवारी रात्री वादळी वार्यासह बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला़ देवकुरळी येथे वीज पडून दोन बैल ठार झाले तर पन्नासहून अधिक घरावरील पत्रे उडून गेले़ तर सांगवी काटी येथील तीस जणांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत़ अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्याला झोडपून काढले आहे़ शेतकर्यांसह सर्वासामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, विजांनी अनेकांचा बळी घेतला आहे़ यंदाच्या मान्सूनपूर्व पावसानेही धुमाकूळ घालतच गुरूवारी आगमन केले़ तामलवाडी व परिसरात गुरूवारी दुपारी पावसामुळे मोठे नुकसान झाले़ विद्युत पोल पडल्याने सांगवी काटी येथील पाणीपुरवठा होऊ शकला नाही़ देवकुरळी शिवारात लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या सौदागर विठोबा जाधव यांचा एक बैल, नेमीनाथ जाधव यांचा एक बैल वीज पडल्याने जागीच ठार झाला़ ऐन पेरणीच्या तोंडावर नैसर्गिक संकट कोसळल्याने या दोन शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ या घटनेची नोंद तामलवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असली तरी शुक्रवारी दुपारपर्यंत बांधकाम विभागाने ही झाडे हटविली नसल्याने वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत होती़ सांगवी काटी शिवारात शेतकर्यांची वस्ती आहे. तेथील राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले़ दगड पडून मोठे नुकसान झाले़ पत्रे उडून गेल्याने अनेकांच्या निवार्याची सोय नाही़ उघड्यावर संसार थाटण्यात आला आहे़ तलाठ्यांना या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार पाटील यांनी दिले आहेत़ गोंधळवाडी येथे विजेचा खांब तुटल्याने गुरूवारची रात्र गावकर्यांना अंधारात घालावी लागली़ उडून गेलेले पत्रे शोधण्यासाठी गावकर्यांची सकाळपासूनच धडपड सुरू होती़ तर पोल्ट्रीत मरण पावलेल्या कोंबड्यांच्या नुकसानीचा मोठा फटका मालकाला सहन करावा लागला आहे़ गारपीट, वादळी वारे यासारख्या आस्मानी संकटांना तोंड देणार्या नागरिकांच्या निवार्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
देवकुरळीत वीज पडून दोन बैल ठार
By admin | Updated: May 31, 2014 00:33 IST