सोयगाव (औरंगाबाद) : प्रेमप्रकरणाच्या संशयातून बनोटी(वाडी) येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीला शुक्रवारी दुपारी मुलाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. प्रेमाचा संशय आणि मारहाण असह्य झाल्याने या मुलीने विषारी द्रव्य प्राशन केले. तिचा आज शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.
दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव आहे. ती बनोटी येथे दहावीची परीक्षा देत होती. शुक्रवारी वाडी गावातीलच कैलास छोटू सोनवणे याच्यासह रंजनाबाई गोटू सोनवणे, जागृतीबाई गोटू सोनवणे, सरलाबाई छोटू सोनवणे, आशाबाई बापू सूर्यवंशी(सर्व रा.वाडी, बनोटी) यांनी दिव्याच्या घरी कोणी नसताना घरात प्रवेश केला. कैलास सोबत तुझे प्रेमप्रकरण असल्याचा जाब विचारत सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. प्रेमप्रकरणाचा संशय आणि मारहाण असह्य झाल्याने दिव्याने विषारी द्रव्य प्राशन केले.
यानंतर तिला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आज पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर दिव्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी तिचा मृतदेह पोलीस स्थानकात ठेवला. आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली.
पोलिसांनी तत्काळ मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून कैलास छोटू सोनवणे( २१), रंजनाबाई गोटू सोनवणे, जागृती गोटू सोनवणे, सरलाबाई छोटू सोनवणे या चार आरोपींना अटक केली आहे. सरलाबाई छोटू सोनवणे हिची प्रकृती खालावल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आशाबाई सूर्यवंशी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक शरद रोडगे, योगेश झाल्टे, सुभाष पवार, प्रदीप पवार, संदीप चव्हाण, वैशाली सोनवणे, महिला गृहरक्षक दलाच्या आशाबाई पाटील करत आहेत.