कन्नड : पशुसंवर्धन विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयाच्या आवारात चक्क मोटार दुरुस्तीचे गॅरेज सुरू आहे. विशेष म्हणजे याठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षांचा त्रास ग्रामीण भागातून येणार्या शेतकर्यांना जसा होतो, तसाच कार्यालयात जाणार्या अधिकार्यांनाही होतो; मात्र तरीही याची दखल संबंधित अधिकारी घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात कन्नड, चाळीसगाव रस्त्यावर पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त यांचे कार्यालय आहे. तथापि, एखाद्या अनोळखी व्यक्तीने कुणाला न विचारता कार्यालय शोधले तर ते आश्चर्यच ठरेल. कार्यालयात जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आहेत. कार्यालयाच्या आवारात सुरुवातीलाच रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुरुस्तीसाठी रिक्षा उभ्या असतात, तर काहींचे दुरुस्तीचे काम सुरू असते. या आवारात असलेल्या निवासस्थानाशेजारी ट्रॅक्टर व ट्रॉली उभी असते. निवासस्थानात कुणीही वास्तव्यास नसल्याने निवासस्थाने बंदच असतात. पशुसंवर्धन विभागाची ही प्रशस्त जागा आहे. तथापि, या जागेवर हळूहळू अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरिष्ठांनी संबंधित अधिकार्यास अतिक्रमण होणार नाही याबाबत काळजी घेण्याबाबत तंबी द्यावी; अन्यथा हळूहळू या जागेवर सर्वच बाजूंनी अतिक्रमण झाल्याशिवाय राहणार नाही. (वार्ताहर)
पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त कार्यालय बनले गॅरेज
By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST