लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील चार तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून, तीन जणांना वाचविण्यात यश आले. रहीम खान अब्बास खान (रा. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद रेल्वेस्टेशनजवळील सादात मोहल्ला, राहुलनगर परिसरातील शेख उमर, शेख गणी शेख अहेमद, रहीम खान अब्बास खान व अन्य एक असे चार तरुण रिक्षाने पैठण येथे पर्यटनासाठी आले होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पर्यटक पॉइंट परिसरात ते धरणात पोहण्यासाठी उतरले; परंतु त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात उतरताच बुडायला लागले. हे दृश्य पाहताच धरणावरील पर्यटकांनी आरडाओरड केली. स्थानिक पोहणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब धरणात उड्या मारून तीन तरुणांना पाण्याबाहेर काढल्याने ते बचावले. रहीमखानला पाण्याबाहेर काढण्यास उशीर झाल्याने तो मरण पावला. मृत तरुणाला घेऊन त्याचे नातेवाईक तातडीने औरंगाबादला रवाना झाले आहेत. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, फौजदार साहेबराव गिरासे, नामदेव कातडे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले व मदतकार्य केले.
जायकवाडी धरणात चार तरुण बुडाले; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:53 IST