चौघांना मिळाले आयुष्य

By Admin | Updated: June 22, 2016 00:57 IST2016-06-22T00:47:44+5:302016-06-22T00:57:21+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून दुसऱ्या शहरात मानवी अवयव नेण्याचा आणखी एक प्रयोग मंगळवारी यशस्वी झाला. अपघातात डोक्यास मार लागल्यामुळे ब्रेन डेड झालेल्या

The four found life | चौघांना मिळाले आयुष्य

चौघांना मिळाले आयुष्य


औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून दुसऱ्या शहरात मानवी अवयव नेण्याचा आणखी एक प्रयोग मंगळवारी यशस्वी झाला. अपघातात डोक्यास मार लागल्यामुळे ब्रेन डेड झालेल्या ३२ वर्षीय तरुणाने जाता जाता चौघांना नवे आयुष्य दिले.
वैजापूर येथील संतोष गुंड यांना दुचाकीवरून जाताना अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये १९ जून रोजी रात्री दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड जाहीर केले. त्यांच्या नातेवाईकांना अवयवदानाविषयी कल्पना देण्यात आली. अवयवदानातून कोणाचा तरी जीव वाचेल आणि त्यातूनच आपल्या व्यक्तीला पुन्हा पाहता येईल, या भावनेने नातेवाईकांनी अवयवदानास तात्काळ संमती दिली. त्यानंतर अवयव प्रत्यारोपणाची तयारी करण्यात आली. त्यानुसार हृदय मुंबई येथे सकाळच्या जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात, यकृत रुग्णवाहिकेने पुण्यातील सह्याद्री रुग्णालय तर दोन किडन्यांपैकी एक धूत हॉस्पिटल आणि एक कमलनयन बजाज हॉस्पिटल येथील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले.
नियोजनाप्रमाणे प्रत्यारोपणासाठी मंगळवारी पहाटे ३ वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळी ६.४० वाजता हृदय घेऊन रुग्णवाहिका चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना झाली.
अवघ्या ८ मिनिटांत रुग्णवाहिका विमानतळावर दाखल झाली. ६.५० वाजता विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता लिव्हर घेऊन रुग्णवाहिका पुण्यासाठी रवाना झाली.
तसेच ८ वाजता एक किडनी घेऊन रुग्णवाहिका बजाज हॉस्पिटलकडे तर एक रुग्णवाहिका धूत हॉस्पिटलकडे रवाना झाली. नियोजित वेळेत, नियोजित ठिकाणी अवयव पोहोचावेत, यासाठी सोमवारी सकाळपासून मंगळवारी दुपारपर्यंत अनेक डॉक्टरांनी प्रयत्न केले. प्रत्यारोपणासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ.उन्मेष टाकळकर, सीईओ डॉ.अजय रोटे, ‘झेडटीसीसी’चे डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. आनंद देवधर, डॉ. सचिन सोनी, डॉ.अरुण चिंचोले, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. सुजित संचेती, डॉ.विशाल कुटे, डॉ. अशोक पटवर्धन, मनोज भरसाळे, कबीर अहमद, विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The four found life