छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी ३१ मार्चपर्यंत येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. एवढ्या कमी वेळेत विविध कामे होणे शक्य नाही. त्यामुळे बुधवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ३० एप्रिलची नवीन डेडलाईन ठरविण्यात आली. उन्हाळा संपण्यापूर्वी तरी शहराला वाढीव स्वरूपात पाणी मिळेल का, असा प्रश्न आहे.
पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी खंडपीठाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियमित आढावा बैठक घेण्यात आली. बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत मनपा प्रशासक जी. श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह नॅशनल हायवे, मनपा अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पाणीपुरवठा योजनेत येणारे नेमके अडथळे कोणते, यावर चर्चा करण्यात आली. त्यावर उपायसुद्धा शोधून अंतिम निर्णयही घेण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यापूर्वी ३१ मार्चपर्यंत शहरात २०० एमएलडी पाणी येईल, असा दावा केला होता. हा दावा फोल ठरला. पुढील २६ दिवसांत विविध कामे होणे शक्य नसल्याचे मजीप्रा अधिकाऱ्यांनी सांगितले.
३० एप्रिल नवीन तारीख३० एप्रिलपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करणे, जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम पूर्ण करावे, त्यावर पंपिंगची यंत्रणा बसविणे, आदी कामे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, मनपा प्रशासक यांनी दिले. ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जलशुद्धिकरण केंद्राच्या कामावरही चर्चा करण्यात आली. यासाठीही मजीप्राने ३० एप्रिलची मुदत दिली. फारोळ्यातील २६ एमएलडीचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाले, तर शहराला तूर्त ५० ते ५५ एमएलडी वाढीव पाणी मिळेल. १ मेनंतर हे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तबपैठण रोडवर २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीवर नॅशनल हायवेने रस्ता तयार केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जलवाहिनीवर वाहतूक सुरू राहिली आणि दुर्दैवाने कधी जलवाहिनी फुटली तर वाहने किमान १०० ते दीडशे फूट हवेत उडतील, असे वृत्तात म्हटले होते. त्यामुळे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने जलवाहिनीला वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका बाजूने लोखंडी बॅरिकेटिंगचा निर्णय झाला. हा खर्च तूर्त मजीप्रा देईल, असे ठरले.
कोणती कामे शिल्लक ?जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ कि.मी.त २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ३७ किमी टाकली. दोन किमी जलवाहिनी टाकणे, ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविणे, चार ठिकाणी सर्ज टँक, पंपिंगची यंत्रणा आदी कामे बाकी आहेत. ही कामे पुढील ५५ दिवसांत पूर्ण होतील का, हा मोठा प्रश्न आहे.