छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात जॅकवेल (पाणी उपसा केंद्र) उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जॅकवेलच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण मार्चअखेरपर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डाेळ्यांसमोर ठेवले आहे.
२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले. या योजनेचा आत्मा म्हणजे जॅकवेल आहे. धरण तुडुंब भरलेले असतानाही कॉफर डॅम्प उभारून रात्रं-दिवस काम सुरू आहे. जॅकवेल १०० मीटर लांब, ३४ मीटर रुंद, खोल १९ मीटर आहे. ११ मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले. संपूर्ण काम मार्चअखेरपर्यंत होणे शक्य नाही. त्यामुळे जॅकवेलचा एक टप्पा पूर्ण केला तरी २०० एमएलडी पाण्याचा उपसा करणे सहज शक्य आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी हे अंतर ३९ किमी असून, आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ४ किमीसाठी दररोज काम सुरू आहे. नॅशनल हायवेने जलवाहिनीवर रस्ता तयार केला. त्यामुळे कामावर कोणताही परिणाम नाही. मजीप्रा कोणत्याही जुगाड पद्धतीचा अवलंब न करता एअर व्हॉल्व्ह नियमानुसारच उभारणार आहे.
जॅकवेलला फुटला पाझरजायकवाडी धरण तुडुंब भरलेले आहे. जॅकवेलमध्ये २४ तासात २०० एमएलडी पाणी पाझरून येते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी दहा पंप २४ तास सुरू ठेवावे लागते. एकही मोटार बंद ठेवली तर जॅकवेलमध्ये कामच करता येत नाही.
मुख्य अभियंत्यांचे मतमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले की, जॅकवेलच्या एका बाजूचे काम पूर्ण करून दोन पंप बसवता येतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणाहून २०० एमएलडी पाणी उपसा करता येईल.
नक्षत्रवाडीत ३ फिल्टर तयारनक्षत्रवाडीच्या डोंगरावर जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. सहा फिल्टर टँकपैकी तीन टँक तयार झाले आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम पूर्ण करण्याचे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसमोर आहे.