उस्मानाबाद : शहरातील जिल्हा रुग्णालयातील यंत्रणांना सध्या गंज लागला आहे़ सिटीस्कॅन मशीन साडेतीन-चार महिन्यांपासून बंद पडली असून, ती केव्हा सुरू होईल याचा पत्ता नाही़ सोनोग्राफी मशीनचा अभाव असून, रुग्णांना दहा ते पंधरा दिवसांची वेटींग करावी लागत आहे़ तर येथील एक दोन नव्हे तब्बल पाच एक्स-रे मशीन मागील तीन वर्षापासून बंद अवस्थेत आहेत़ जुनाट यंत्रणा असल्याने याचे पार्टही उपलब्ध होत नसून, आरोग्य मंत्र्यांकडे पालकत्त्व असलेल्या जिल्हा रुग्णालयाची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे़ विशेषत: डिजिटल मशीनसाठी प्रस्ताव पाठवूनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे़सोलापूर- औरंगाबाद आणि मुंबई- हैैद्राबाद राष्ट्रीय महामार्गासह राज्य, ग्रामीण भागातील मार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात येते़ जिल्हा रुग्णालयात आणलेल्या रुग्णांचे सिटीस्कॅन, एक्स- रे आदी तपासण्या वैद्यकीय अधिकारी करतात़ या तपासण्यांमुळे रुग्णांच्या जखमेचे गांभीर्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळते आणि त्यानुसार ते जखमींवर, रुग्णांवर औषधोपचार करतात़ मात्र, जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन मागील चार महिन्यांपासून बंद आहे़ तर येथे असलेल्या सहा एक्स- रे मशीन पैकी तब्बल पाच एक्स- रे मशीन मागील अडीच- तीन वर्षापासून बंद पडल्या आहेत़ चालू असलेली एक मशीन जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वीची आहे़ एक्स-रे मशीनद्वारे एक्स- रे काढताना मशीन गरजेनुसार हलविली जाते़ मात्र, जिल्हा रुग्णालयातील मशीनला तांत्रिक अडचण असल्याने गरजेनुसार रुग्णांना बसवून, उभा करून एक्स-रे काढले जात आहेत़जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमी, हाडाच्या आजाराने ग्रासलेले, दम्याचे रुग्ण, छातीचा एक्स-रे, हात-पायासह शरिराच्या विविध अवयवांचा आजारानुसार एक्स-रे काढण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात़ मात्र, जिल्हा रुग्णालयातील बंद पडलेल्या मशीन आणि उपलब्ध मशीनला असलेली तांत्रिक अडचण यामुळे रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे़ जिल्हा रुग्णालयाकडून डिजिटल एक्स-रे मशीन मिळावी, यासाठी वेळोवेळी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ मात्र, या प्रस्तावांना आरोग्य विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे़ आरोग्यमंत्री दीपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ही अवस्था आहे़ त्यामुळे भविष्यात जिल्हा रुग्णालयाला केव्हा आधुनिक यंत्रणा मिळणार? याचे उत्तर कोणाकडेही नाही ! (वार्ताहर)
पाच एक्स-रे मशीन तीन वर्षांपासून बंद
By admin | Updated: June 23, 2016 01:10 IST