दुधड ( छत्रपती संभाजीनगर): लाडसांवगी येथील मंडळाधिकारी देवराव गोरे व तत्कालीन तलाठी नीता चव्हाण यांनी गेवराई कुबेर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी महिला कासाबाई विठ्ठल कुबेर यांची सातबाऱ्यावरील १३ गुंठे शेतजमीन परस्पर कमी केली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात रविवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार यांनी शेतकरी महिलेच्या नावावर सुधारित सातबारा पूर्ववत करावा, असा आदेश दिला.
कासाबाई कुबेर यांच्या पतीच्या निधनानंतर वारसाहक्काने त्यांच्या नावावर सातबारामध्ये जमिनीची नोंद घेण्यात आली. पतीच्या नावावर १ हेक्टर ६३ आर जमीन असताना त्यांच्या नावावर १ हेक्टर ५० आर जमीन दाखविली होती.
याबाबत ‘लोकमत’ने ‘आले तलाठ्याच्या मना; तेथे कुणाचे काही चालेना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महसूल विभागाने तातडीचे पावले उचलली. तहसीलदार यांनी मंगळवारी मंडळाधिकारी व तलाठी यांना सातबारा दुरुस्ती करून सदर शेतकरी महिलेच्या नावावरील कमी केलेले क्षेत्र पूर्ववत करावे, असा लेखी आदेश दिला. तक्रारदार शेतकरी महिला कासाबाई कुबेर व ज्ञानेश्वर कुबेर यांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले.
महिलेच्या नावावर सुधारित सातबारातहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातून सर्व फेरफार नक्कल काढून कमी झालेली जमीन तक्रारदार महिलेच्या नावावर सुधारित सातबारा करण्यासाठी तहसीलदार यांना सोमवारी अहवाल सादर केला होता. त्या आधारे तहसीलदार यांनी शेतकरी महिलेच्या नावावर सुधारित सातबारा दुरुस्ती करून पूर्ववत करावा, असा आदेश दिला आहे.-नीता चव्हाण, तत्कालीन तलाठी