लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : लग्नाच्या काही मिनिटेआधीच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पैठण तालुक्यातील रहाटगाव येथे सोमवारी दुपारी २ वाजता घडली. पांडुरंग पिराजी वीर (५५, रा. रहाटगाव, ता. पैठण) असे मयत वधूपित्याचे नाव आहे.विवाह मंडपात वधू व वराकडील मंडळी बसलेली, नवरदेवाची गावातील हनुमान मंदिरातून मिरवणूक निघाली, विवाह सोहळ्याच्या जय्यत तयारीचे वातावरण, सर्व परिसरात विवाह सोहळ्याची धामधूम सुरू होती आणि काही मिनिटांत वधू प्रियंका वीर व पंढरपूर-वाळूज येथील वर रवींद्र घोडके यांचे लग्न लागणार तोच वधूपित्यास अचानक हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना पैठण येथील रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु दुर्दैवाने रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.तोपर्यंत इकडे वधू-वर विवाह मंडपात आलेले अशा परिस्थितीत नातेवाईकांनी वधूपित्याच्या मृत्यूची बातमी कुणालाही दिली नाही व विवाह सोहळा आटोपून घेतला. लग्न लागल्यानंतर ही बातमी वधूच्या कानावर गेली आणि तिने टाहो फोडला. मुलीच्या विवाहाचे स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभर कष्ट उपसलेल्या वधूपित्यास लाडक्या लेकीच्या विवाहात अक्षदाही टाकता आल्या नाहीत. आपल्या पित्याच्या विरहाने वधूने केलेल्या आक्रोशाने उपस्थितांनाही रडू कोसळले. या दुर्दैवी घटनेने रहाटगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.लग्नसोहळ्यावर शोककळावीर यांच्या मृत्यूची बातमी समजताच आनंदाचे वातावरण असलेल्या लग्नमंडपात काही क्षणातच शोककळा पसरली. वडील आपल्याला सासरी वाटी लावतील, सासरी निघताना वडिलांच्या गळ्यात पडून निरोप घेऊ, असे स्वप्न बघत असलेल्या वधूवर विवाहप्रसंगीच वडिलांना निरोप देण्याचा दुख:द प्रसंग ओढवला.
लग्नाच्या काही मिनिटेआधीच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:22 IST