छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा येथे एका ३२ वर्षीय गरोदर महिलेच्या गर्भात गर्भ असल्याचे निदान झाले आहे. या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग सज्ज आहे. प्रसूतीनंतर नवजात शिशूच्या पोटातील गर्भ लगेच काढण्याची शस्त्रक्रिया करायची अथवा शस्त्रक्रिया पुढे करायची, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ आढळणे ही दुर्मीळ घटना आहे. बुलढाणा येथील या गरोदर महिलेला छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ही महिला घाटीत दाखल झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, कोणत्या तपासण्या कराव्या लागतील, याचे नियोजन अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांनी केले. संबंधित रुग्ण घाटीत केव्हा येणार आहे, यासंदर्भात त्यांनी बुलढाणा येथील अधिकाऱ्यांशी संपर्कही साधला.
‘एमआरआय’ने अधिक स्पष्टताप्रसूतीपूर्वी अत्याधुनिक अशा मशीनद्वारे सोनोग्राफी आणि ‘एमआरआय’ तपासणी करण्याचे नियोजन आहे. यातून गर्भात असलेली स्थिती आणखी स्पष्ट होण्यास मदत होते. ही महिला दाखल झाल्यानंतर प्रकृतीनुसार नैसर्गिक प्रसूती की सिझेरियन प्रसूती होईल, हेही स्पष्ट होईल, असे डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले.