गडगा : राष्ट्रीय पीकविमा योजनेत सहभागी होण्याची मुदत ३१ जुलै असल्याने पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. याकामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेतू सुविधा केंद्र चालकांकडून आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया लोकमतकडे व्यक्त करीत पीकविमा काढण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली़जिल्ह्यात दुबार, तिबार पेरणी केल्यानंतरही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरणी संकटात सापडली़ यापूर्वी रबी हंगाम गारपिटीने गेला़ आता खरीप हंगाम तरी साथ देईल या आशेवर शेतकऱ्यांनी मध्यम स्वरुपाच्या पावसावरच पेरणी केली़ त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही़ पुन्हा काही दिवसाने पाऊस झाल्याने दुबार पेरणी केली़ परंतु अजूनही दमदार पाऊस न झाल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे़संभाव्य संकटाचे संकेत लक्षात घेता राष्ट्रीय पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच धावपळ सुरू केली असून सातबारा काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी होत आहे़ या संधीचा फायदा उठवित सेतू सुविधा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असून सातबाराचा निर्धारित दर २२़५० असताना २५ ते ३० रुपये सर्रासपणे घेतले जात आहे़ याकडे महसूल (तहसील) यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे़ अशीच काहीशी स्थिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेत सुरू आहे़ बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना ५०० रुपये, तर खाते नसणाऱ्यांना १ हजार रुपये अनामत ठेव जमा करण्याचे फर्मान काढले आहे़ यामुळे असंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत़ अशातच ३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून आॅनलाईन संकेतस्थळ बंद झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळणे कठीण झाले़ यामुळे पीकविमा योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी आत्माराम पाटील, दत्ता जाधव, आप्पाराव इंगोले, मोहनराव पाटील, संतोष जाधव, त्र्यंबक पा़देवणे यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांनी केली आहे़ (वार्ताहर) विमा भरण्यासाठी नांदेड जिल्हा बँकेच्या मांजरम शाखेत गेलो असता तुम्ही खातेदार असाल तर ५०० रुपये, नसाल तर हजार रुपये अनामत ठेव रक्कम भरावी लागेल़ अन्यथा तुम्हास पीकविमा भरता येणार नाही, असे बँक व्यवस्थापकाने सांगितले़ विमा हप्ता रकमेपेक्षा बँकेत अनामत रक्कम अधिक भरण्याची सक्ती असल्यामुळे पीकविमा योजनेपासून आम्हाला वंचित राहण्याशिवाय पर्याय नाही - संदीप गायकवाड, गिरीष पांडे, प्रल्हाद रामा मरेवाड, दत्ता बोईनवाड, शेख गौस (शेतकरी)़कर्जदार शेतकऱ्यांना अनामत ठेव जमा करण्याची गरज नाही़ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ५०० रुपये ठेव जमा करणे आवश्यक आहे़ गारपीटग्रस्त लाभार्थींचे खाते झीरो बजेटवर काढण्यात आले होते़ त्यामुळे त्यांच्या खात्यावर अनामत ठेव जमा नसल्याने अशा शेतकऱ्यांना ठेव जमा करणे बंधनकारक आहे - कदम, जिल्हा व्यवस्थापक, जि.म़सहकारी बँक़शेतकऱ्यांचे खाते जरी बँकेत असले तरी खात्यावर ठेव (रक्कम) जमा नसल्यामुळे संगणक विम्या हप्त्याची रक्कम रिसीव्ह करीत नाही़ म्हणून ५०० रुपये ठेव जमा करून घ्यावी लागत आहे़ कर्जदार, बिगर कर्जदार अशा सर्वांनाच खात्यावर ठेव जमा करावी लागेल, नाही तर विमा भरता येणार नाही - उमरे, शाखाधिकारी, म़स़बँक, शाखा रातोळी़सेतू केंद्राच्या तक्रारीसंदर्भात तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या मी मिटींगमध्ये आहे, तुम्हाला नंतर बोलेन असे उत्तर दिले़
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By admin | Updated: August 2, 2014 01:07 IST