औरंगाबाद : किरकोळ कारणावरून यश महेंद्रकरचा खून करणारा आरोपी राजेश नामदेव जाधव (१९, रा.हर्सूल परिसर) याच्याकडे त्याच्या नातेवाइकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले. त्याला अटक होऊन तीन दिवस उलटले, तरी एकाही नातेवाइकाने त्याची विचारपूस केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
बी.एस्सी. ॲग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या राज जाधवने त्याचा मित्र यशचा शनिवारी रात्री मयूरपार्क येथे चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी यशविरुद्ध हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी राज सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी राज जाधवचे वडील महसूल विभागात लिपिक आहेत. त्याचा मोठा भाऊ पुणे येथे शिक्षण घेतो. राजला पोलिसांनी अटक केल्यानंतर आणि तो पोलीस कोठडीत असल्यावरही एकाही नातेवाइकाने त्याची पोलिसांकडे विचारपूस केली नाही. ना कुणी हर्सूल पोलीस ठाण्याकडे फिरकले.
पश्चात्ताप झाल्याने रडू लागलायशला चाकूने भोसकल्यावर मित्रांनी त्याला जळगाव रोडवरील खासगी रुग्णालयात नेले होते. तेथे बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी त्याला तेथून घाटीत हलविले होते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. यशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आरोपी राज हा मृतासोबत असलेल्या मित्रांच्या संपर्कात होता. यशची तब्येत कशी आहे, वाचेल का तो, असे तो त्यांना विचारत होता. यशचा मृत्यू झाल्याचे समजताच, त्याने फोन बंद केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला लगेच पकडले. पोलीस कोठडीत असताना, त्याला आता यशच्या खुनाबद्दल पश्चात्ताप झाला आहे. आता तो रडत असल्याचे सूत्राने सांगितले. फौजदार मारुती खिल्लारे या घटनेचा तपास करीत आहेत.
आरोपीकडून चाकू जप्तयशचा खून करण्यासाठी वापरलेला धारदार चाकू पोलिसांनी रविवारी त्याच्याकडून जप्त केला. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आरोपी राज होता शिक्षणासाठी कोकणातराज वाईट मुलांच्या संगतीत अडकल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी त्याला दापोली येथे बी.एस्सी. ॲग्रिकल्चरल अभ्यासक्रमासाठी प्रवेशित केले. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे तो औरंगाबादला परतला होता.