छत्रपती संभाजीनगर : उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावे गुंतवणुकीचे बनावट ॲप तयार करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत शहरातील एका उद्योजकाला लाखोंचा गंडा घालण्यात आला. पैसे पाठवून विदेशात गेलेल्या उद्योजकाने प्रेमजी यांच्या समूहाची मूळ वेबसाइट उघडून पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, यातील अर्धेअधिक पैसे बीडच्या बँक खात्यात गेल्याने राज्यातही वेगाने सायबर गुन्हेगारांचे जाळे तयार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
५७ वर्षीय उद्योजकाची स्वत:ची कंपनी आहे. ८ जुलै रोजी त्यांना व्हॉट्सॲपला एका अज्ञात क्रमांकावरून प्रेमजी एक्स कंपनीत गुंतवणुकीबाबत विचारणा करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात उद्योजकाने पुन्हा गुगलवर अझीम प्रेमजी यांच्या कंपनीत गुंतवणुकीविषयी माहिती घेतली. ११ सप्टेंबर रोजी त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून काॅल प्राप्त झाला. तन्वी देशपांडे नामक तरुणीने कंपनीची माहिती दिली. एक लिंक पाठवून १०६- प्रेमजी इन्व्हेस्टमेंट नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर त्यांना प्रेमजी इन्व्हेस्ट नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते देखील उद्योजकाने इंस्टॉल केले. त्यात विविध प्रकारच्या गुंतवणुकीविषयी पर्याय होते. उद्योजकाने त्यावर विश्वास ठेवत पहिले ३० व नंतर ४३ लाख रुपये थेट पाठवून दिले.
विदेशातून परतल्यानंतर बसला धक्का७३ लाख रुपये पाठवून स्वत:च्या कंपनीच्या कामानिमित्त उद्योजक विदेशात गेले. विदेशातून परतल्यानंतर गुंतवलेल्या पैशांचे स्टेटस तपासण्यासाठी त्यांनी कंपनीच्या मूळ वेबसाइटला भेट दिली, तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. त्याच वेबसाइटवर त्यांच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट वेबसाइट, ॲपबाबत पत्रक जारी करण्यात आले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले.
राज्यातही सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या तयारसामान्यत: सायबर गुन्ह्यात प्रामुख्याने दिल्ली, नोएडा, उत्तरप्रदेश, राजस्थान भागातील टोळ्या सहभागी असतात. मात्र, आता राज्यातही अनेक साायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे या गुन्ह्यावरून निष्पन्न झाले. उद्योजकाचे अर्धेअधिक पैसे बीडच्या बँक खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले.
८०० पेक्षा अधिक व्यवहार, तपास आव्हानचबीडच्या बँक खात्यातून उद्योजकाचे पैसे पुढे शेकडो बँक खात्यांवर वळते होत पुढे पाठवण्यात आले. जवळपास ८०० पेक्षा अधिक व्यवहार होत ते पुढे पाठवले गेले. त्यामुळे शेवटच्या बँक खात्यावर जाणे तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.
हे लक्षात ठेवा:- वेबसाइटची खातरजमा करा, अनोळखी ॲप इंस्टॉल करू नका-कुठल्याही कंपनीच्या नावाने मिळालेल्या गुंतवणुकीच्या लिंक, मेसेज किंवा कॉलवर लगेच विश्वास ठेवू नका. गुंतवणुकीआधी कंपनीची अधिकृत वेबसाइट तपासा.-अज्ञात क्रमांकावरून आलेल्या लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नका. त्या फिशिंग म्हणजेच सायबर गुन्हेगारांच्या असतात.-गुंतवणूक किंवा दामदुप्पट परताव्याच्या नावाने तयार केलेले व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम चॅनेल आणि ॲप्स फसवणुकीसाठी तयार केलेले असतात.-गुंतवणूक करताना कंपनीचा नोंदणी क्रमांक, परवाना व बँक खाते अधिकृत आहेत का, याची खातरजमा करा. सेबी, आरबीआय किंवा एमसीएच्या वेबसाइटवर नोंद आहे का हे तपासा.
Web Summary : An entrepreneur from Chhatrapati Sambhajinagar lost ₹73 lakh to a fraudulent 'Premji Invest' app promising high returns. The victim realized the scam after checking the official website upon returning from abroad. Police investigation revealed a cybercrime network extending to Beed.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर के एक उद्यमी को फर्जी 'प्रेमजी इन्वेस्ट' ऐप से ₹73 लाख का नुकसान हुआ, जिसने उच्च रिटर्न का वादा किया था। विदेश से लौटने पर आधिकारिक वेबसाइट जांचने पर पीड़ित को घोटाले का पता चला। पुलिस जांच में बीड तक फैले साइबर अपराध नेटवर्क का खुलासा हुआ।